वाई : पुढारी वृत्तसेवा वाई तालुक्यात धोम व बलकवडी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला धोम 45 तर बलकवडी धरण 60 टक्के भरले आहे. नदी, नाले व ओढयांना पूर आला आहे. जून नंतर जुलैही कोरडा जातो की काय? अशी अवस्था असताना या पहिल्या पंधरवड्यातच समाधानकारक पाऊस झाला आहे. पिकांच्या पेरण्या झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी भाग लागण खोळंबली आहे.
मे अखेर दोन्ही धरणात 50 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावेळी प्रथमच धोम धरणातून शेतीसाठी चार आवर्तने सोडण्यात आली होती. यामुळे यावर्षी शेतकर्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला नाही. दोन दिवसात बलकवडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे.
धोमधरण 13 टीएमसीचे आहे. धरण परिसरात पावसाचा जोर चांगला असून धरणात 5 ते 6 टीएमसी पाणी साठा झाला आहे. तर 340 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच धरणात 4087 क्युसेस पाण्याचा फ्लो येत आहे. धोम धरणात 45 टक्के पाणीसाठा झाला असून दोन दिवसात दीड मीटरने पाणी पातळी वाढली आहे.
बलकवडी धरण हे 2.77 टीएमसीचे आहे बलकवडी धरणात सध्याच्या घडीला 70 टक्के पाणीसाठा झाला होता. पाणलोट क्षेत्रात 875 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर या भागात 1201 पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर असाच राहिल्यास 15 दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे.
जून कोरडा गेल्यानंतर 7 जुलैला पावसाला सुरूवात झाली. परंतु, त्यापूर्वीच धुळवाफेवर घेवडा, सोयाबीन व अन्य कडधान्यांच्या पेरण्या उरकल्या होत्या. भात लागणसाठी मात्र पुरेसा पाऊस नसल्याने खोळंबल्या होत्या. बहुतांशी शेतकर्यांनी पावसाची वाट न पाहता पर्यायी उपाययोजना करत लागण करण्याची तयारी केली. उशिरा का होईना पण वरुणराजाचे दमदार आगमन झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पाचगणी, महाबळेश्वर मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर-दर्यातून मोठया प्रमाणात पाणी धरणांमध्ये येत आहे. धबधबे सर्वत्र कोसळत आहेत. ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे.
हेहीे वाचा