खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पुणे-पानशेत रस्ता खचल्याने धरणे, लष्करी केंद्र, पर्यटन केंद्र अशा महत्त्वाच्या संस्था असलेल्या पानशेत परिसराचा संपर्क तुटला आहे. लागोपाठ चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडलेला रस्ता उद्ध्वस्त होऊन खडकवासला धरणात वाहून जाण्याची शक्यता आहे. धरणातील पाण्याच्या लाटा आदळून रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. दरम्यान इतर वाहतुकीसह एसटीची ये-जाही थांबली होती. वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्या देखरेखीखाली सायंकाळी पाच वाजता लहान वाहनांसाठी एका बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे आदींनी सायंकाळी उशिरा पाहणी केली. भोसले म्हणाले, 'धरणाच्या तीरावर रस्ता असल्याने पाण्याच्या लाटांनी रस्त्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे रस्ता खचला आहे. अतिवृष्टीमुळे काम करण्यात अडथळे येत आहेत. दुर्घटना घडु नये, यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद केली आहे. पाऊस कमी होताच तातडीने रस्त्याचे काम केले जाणार आहे.'
शिंदे म्हणाले, 'वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने रुग्ण, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आदींना मोठ्या हालाखीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे दुचाकी व लहान वाहनांसाठी एका बाजूला वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मोठ्या वाहनांना बंदी आहे. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.' पानशेत धरण फुटल्यानंतर खडकवासला तीरावरील सोनापूर व रुळे गावादरम्यानचा पुणे-पानशेत रस्त्याचा मोठा भाग खचला होता. तेव्हापासून या ठिकाणी रस्ता खचत आहे.
पानशेत धरणग्रस्त कृती समितीचे संस्थापक शंकरराव ठाकर पाटील म्हणाले, 'धरणाच्या तीरावर लाल माती आहे. माती पाण्यामुळे दर वर्षी खचत आहे. तात्पुरत्या स्वरूपाचे काम केले जाते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.' एका बाजूला धरण व दुसर्या बाजूला डोंगर आहे. त्यामुळे धरण तीरावरील पंधरा किलोमीटर अंतराचा पुणे-पानशेत रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्ता खचल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा पुढे आला आहे
साठ गावांतील जनजीवन विस्कळित
अतिवृष्टीमुळे बुधवारी सोनापूर व रुळे गावादरम्यान धरणातील पाण्याच्या लाटांनी रस्ता खचून भगदाड पडू लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने दुपारपासून रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. सुरक्षेसाठी रस्त्यावर वेल्हे पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. एसटी, पीएमपीएल बससह सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पानशेत, वरसगाव परिसरातील साठ गावांचा संपर्क तुटला आहे.