पंचगंगेची पातळी 36 फूट 5 इंच : 59 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्याही पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेला आलेल्या पुराचे ड्रोनद्वारे तौफिक मिरशिकारी यांनी टिपलेले हे छायाचित्र.
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्याही पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेला आलेल्या पुराचे ड्रोनद्वारे तौफिक मिरशिकारी यांनी टिपलेले हे छायाचित्र.

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीपासून केवळ तीन फूट दूर आहे. बुधवारी रात्री ही पातळी 36.5 फुटांवर गेली. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले असून, पुराचा धोका वाढला आहे. 100 हून अधिक गावांशी पर्यायी मार्गाने संपर्क सुरू आहे. जिल्हा प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आले असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिवसभर शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हेलिपॅडसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, स्थानिक रेस्क्यू फोर्ससह संबंधितांना सज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या 24 तासांत सरासरी 31.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात पावसाची संततधार कायम होती. यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी सायंकाळी पुन्हा अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचा सायंकाळी जोर इतका होता की, अवघ्या चार-पाच फुटांवरीलही काही दिसत नव्हते.

धुवाँधार पावसाने अनेक रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. ठिकठिकाणी पाणी साचले. सायंकाळीच पाऊस आल्याने घराकडे परतणार्‍यांचे हाल झाले. बाजारपेठा, भाजी मंडई, दुकाने आदी ठिकाणच्या गर्दीवर परिणाम झाला. बहुतांशी ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला.

सर्वत्र सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेची पातळी सकाळी सात वाजता 35.2 फुटांवर होती. यामध्ये दिवसभरात वाढ होत 12 तासांत या पातळीत एक फुटाची वाढ झाली. सायंकाळी सात वाजता ही पाणी पातळी 36 फूट 1 इंचावर गेली होती. पुराचे पाणी बुधवारी सायंकाळी शिवाजी पूल रस्त्यावरील गायकवाड पुतळ्यापुढे आले. एका बाजूने रस्ता रिकामा असल्याने त्यावरून दिवसभर वाहतूक सुरू होती. उद्या, गुरुवारी या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.

बुधवारी दिवसभरात आणखी सहा बंधारे पाण्याखाली गेले. यामुळे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेल्या बंधार्‍यांची संख्या 59 वर गेली. यामुळे जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. या गावांशी पर्यायी रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. धामणी खोर्‍यातील दहा गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. काही ठिकाणी पुलांवर कमी पाणी आहे, त्यातूनच नागरिकांची ये-जा सुरू आहे. टेकवाडी गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी आहे. यामुळे गावातील नागरिकांना परिसरातील शेतीतून मार्ग काढत मुख्य रस्त्यापर्यंत ये-जा करावी लागत आहे.

गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी

जिल्ह्यात बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 31.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली. तिथे अनुक्रमे 86.3 व 65.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. हातकणंगलेत 10.3, शिरोळमध्ये 5.7, पन्हाळ्?यात 29.4, शाहूवाडीत 33.9, करवीरमध्ये 23.9, कागलमध्ये 29.8, गडहिंग्लजमध्ये 17.8, भुदरगडमध्ये 51.5, आजर्‍यात 36.5, तर चंदगडमध्ये 52.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.

बारा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी जंगमहट्टी (36), कासारी (37) व आंबेओहोळ (54) ही तीन धरणे वगळता उर्वरित 12 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. तुळशी परिसरात सर्वाधिक 201 मि.मी. पाऊस झाला. पाटगाव 167, कुंभी 152, घटप्रभा 138, राधानगरी 126, कोदे 112, दूधगंगा 96, वारणा 87, चिकोत्रा 80, कडवी 77, चित्री 72 व जांबरेत 71 मि.मी.पावसाची नोंद झाली.

राधानगरी धरण 60 टक्के भरले

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, राधानगरी धरण बुधवारी रात्री 60 टक्के भरले. धरणात सध्या 5 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या विसर्गात किंचित वाढ करण्यात आली आहे. धरणातून सध्या 1 हजार 400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील पूर्ण क्षमतेने भरलेली तीन तसेच 48 टक्के भरलेले दूधगंगा धरण वगळता बहुतांशी सर्व धरणे निम्म्याहून अधिक भरली आहेत.

कोयनेत 38 टीएमसी पाणी

कोयना धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 38.48 टी.एम.सी. पाणीसाठा झाला होता. कोयनेतून एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'वर

जिल्ह्यातील पूरस्थिती वाढण्याचा धोका आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, बुधवारी प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील संभाव्य पूरबाधित गावांची पाहणी केली. नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आल्यास, त्यासाठी तयार ठेवण्यात आलेल्या निवारा शेड, जनावरांच्या छावण्यांची त्यांनी पाहणी केली. नागरिकांच्या स्थलांतरापासून ते अन्य विविध उपाययोजनांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेत सतर्कतेच्या सूचना दिल्या.

प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक हेलिपॅडसाठी जागा निश्चित करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा जागांची निश्चिती केली आहे. जिल्ह्यात 'एनडीआरएफ'च्या दोन तुकड्या सज्ज आहेत, त्यासह जिल्हा प्रशासनाच्या स्थानिक जवानांनाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news