सातारा

तासवडे टोलनाका : दहशत बिबट्याची: वहागाव, घोणशी परिसरात दर्शन; शेतीची कामे खोळंबल्याने अडचणी

सोनाली जाधव

तासवडे टोलनाका : पुढारी वृत्तसेवा
वहागाव, घोणशी, तळबीड परिसरात सुमारे साडेतीन उंचीच्या बिबट्याचे शेतकरी, शेतमजूर यांच्यासह स्थानिकांना दर्शन होत आहे. त्यामुळेच शेतींच्या कामांचा खोळंबा झाला असून वन विभागास बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वारंवार विनंती करूनही ठोस कार्यवाहीच होत नाही. त्यामुळेच संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

वहागाव, घोणशी, तळबीड, वनवासमाची या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. महिनाभरापूर्वी खोडशी गावात बिबट्याचा बछडा फासकीत आढळल्याची घटना घडली होती. यावेळी त्या बछड्यासह आणखी काही बिबट्यांचा वावर असल्याचे समोर आले होते.ही घटना ताजी असतानाच मागील काही दिवसात काही वेळा वहागाव परिसरातील डोंगर परिसरात सुभाष माने, अण्णासोा पवार, आबासोा पवार, राजू मुल्ला, राजेंद्र पवार या शेतकर्‍यांनी दिवसाढवळ्या बिबट्या पाहावयास मिळाला. या शेतकर्‍यांची शेती डोंगराकडील भागात आहे. रात्री-अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागते. दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर या परिसरात आहे. अनेकांनी हाकेच्या अंतरावरून बिबट्या पाहिल्यामुळे नागरिकांच्या मध्ये बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे.

शेतामधील कामे करण्यासाठी शेतमजूर कामावर येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची शेतीतील कामे खोळंबली आहेत.दरम्यान दोन दिवसापूर्वी घोणशी परिसरात दोन पिल्ले आणि एक मादी बिबट्याचे दर्शन अनेक शेतकर्‍यांना झाले आहे. घोणशी आणि खोडशी गावाच्या दरम्यान नदीकडेला असणार्‍या शेतामध्ये ही दोन पिल्ले आणि मादी बिबट्या दिसून आला आहे. दरम्यान, वनविभागास परिसरातील शेतकर्‍यांनी बिबट्याची माहिती देत बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे. मात्र त्यानंतरही वनविभागाकडून शेतकर्‍यांसह स्थानिकांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळेच संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

अनर्थ घडल्यास वनविभागच जबाबदार असेल

दोन आठवड्यापासून वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. मात्र त्यानंतरही वनविभागाचे कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. येणके येथे बालकाचा बळी घेतल्यानंतर किरपे येथेही बिबट्याने बालकावर हल्ला केला होता. त्यामुळे अशा घटना वहागाव परिसरात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात अनर्थ घडल्यास त्यास केवळ वनविभागाच जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया अण्णासोा पवार यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT