सीएनजी पीएनजी होणार 5 रुपयांनी स्वस्त | पुढारी

सीएनजी पीएनजी होणार 5 रुपयांनी स्वस्त

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पीएनजी वापरकर्त्या गृहिणींसह सीएनजी वाहन चालकांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळालेला आहे. सीएनजी पीएनजी निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या नैसर्गिक वायूवरील मूल्य वर्धित करात थेट 13.50 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा अर्थ मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली आहे. त्यामुळे पीएनजी आणि सीएनजी वायूचे दर सुमारे 5 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर मुंबईत घरगुती पाईप गॅस अर्थात पीएनजीचे दर 39.50 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. गेल्या वर्षभरात पीएनजी दरात 29.50 रुपयांवरून 39.50 रुपयांपर्यंत म्हणजेच 35 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. परिणामी, अर्थ संकल्पातील या घोषणेमुळे पीएनजी दर 35 रुपयांपर्यंत कमी होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 250 कोटींचा निधी

हवेली तालुक्यातील वढू बुद्रुक व तुळापूर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 250 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला हेरिटेजचे रूप दिले जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ बनविण्यासाठी अनेक विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.

विजयस्तंभासाठी निधीची तरतूद

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या ठिकाणी सोयी-सुविधांनी युक्त अशा स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यक्रमाअंतर्गत हा विकास करण्यात येणार आहे.

Back to top button