_खटाव : पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि मानाचे बैलगाडी शर्यतींचे हिंदकेसरी मैदान मंगळवारी सळसळत्या उत्साहात आणि हजारो शौकिनांच्या उपस्थितीत पार पडले.सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांच्या परवानगीने पुसेगावच्या माळ रानावर सात वर्षांनी वार्याच्या वेगाचा थरार अनुभवत 'भिर्रर्रर्रर्र'ची आरोळी घुमली.
प.पू. श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली, डोळ्यांचं पारणं फेडणारी ही मानाची शर्यत रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वेळेअभावी अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व गाडी मालकांना बक्षिसांची रक्कम विभागून देण्यात आली. महाराष्ट्रातील नामांकित समजल्या जाणार्या पुसेगावच्या बैलगाडी शर्यतीसाठी राज्यभरातून बैलगाड्या घेऊन मालक-चालक मोठ्या संख्येने पहाटेपासूनच उपस्थित होते. स्पर्धा पाहण्यासाठी शेतकरी आणि बैलगाडी शर्यत शौकिनांनी देखील हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी एकापेक्षा एक वरचढ जातिवंत खिल्लार आणि म्हैसुर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार या मैदानात प्रेक्षकांना अनुभवायास मिळाला. स्पर्धेतील प्रत्येक फेरा चुरशीचा होऊन स्पर्धा उत्कंठावर्धक झाली. ही तीन राऊंड बैलगाडी शर्यत होती. शर्यतीला 425 बैलगाड्या होत्या. गटाचे 58 फेरे व सेमी फायनलच्या 8 फेर्या पार पडल्या. अंधार पडल्याने वेळेअभावी फायनलचा फेरा रद्द करण्यात आला. सेमीफायनलमधील नऊ विजेत्या मालकांना बक्षिसांची रक्कम विभागून देण्यात आली.
विजयी गाडी मालकांची नावे याप्रमाणे – सुमित दत्तात्रय जाधव (पुसेगाव), डी. के. दादा (इस्लामपूर), नितीन शेवाळे (पुणे) आणि विजय मेडिकल (पुसेगाव), शौर्यजित गौतम काकडे (निंबुत), योगेश पैलवान (खातगुण), शारदा पाटील (पुणे), रिया जयश पाटील (सोनारपाडा, मुंबई), दत्ता गायकवाड (वडकी), अक्षय राजेंद्र गिरी (सातारा), देवांश पाटील (सुपने).
या स्पर्धेचे उद्घाटन तसेच बक्षिसांचे वितरण श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, माजी विश्वस्त विजय जाधव, जीवन जाधव, बाबू जाधव, सचिव विशाल माने व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तब्बल सात वर्षांनंतर पुसेगावला मानाच्या हिंदकेसरी बैलगाडी शर्यती पार पडल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने बैलगाडी चालक, मालक आणि शौकीन पुसेगावात आले होते. दिवसभर जातिवंत खिलार आणि शर्यतींच्या एक से बढकर एक बैलांना पाहण्याची आणि वार्याच्या वेगाचा थरार अनुभवण्याची संधी या शर्यतींमुळे उपलब्ध झाली. दिवसभरात डोळ्यांचे पारणे फेडणार्या शर्यती पाहताना मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील मोठमोठ्या शहरांमधील शौकीन आणि गाडीमालकांनी बैल खरेदी विक्रीची बोली करताना कोट्यवधींची उलाढाल केली.