कराड : भाजप नेते, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 संशयितांचा समावेश असलेल्या यशवंत बँक अपहारप्रकरणी ईडी कार्यालयाकडून तपासाला गती दिली आहे. यापूर्वी तिघांकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील आणखी 27 जणांना गुरुवारी समन्स बजावले आहे.
चरेगावकर यांच्यासह बँकेचे माजी व विद्यमान चेअरमन, संचालक, अधिकारी, कर्मचारी व नातेवाईकांसह एकूण 50 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. सनदी लेखापाल सी. ए. मंदार देशपांडे यांनी फिर्याद दिली आहे. बँकेच्या 2014 ते 2025 या कालावधीत झालेल्या व्यवहारांचे वैधानिक लेखापरीक्षण करताना हा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बोगस कर्ज प्रकरणे, बनावट कागदपत्रे, तारण न घेता कर्जवाटप करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवीन खाती उघडून अन्य लोकांकडे निधी वळवल्याचा दावा केला जात आहे.
मागील महिन्यात 23 डिसेंबरला याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कराड, फलटण यासह जिल्ह्यातील पाच ठिकाणी छापे टाकले होते. शेखर चरेगावकर यांचे बंधू शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांच्यासह अन्य दोघा संशयितांच्या उपस्थितीत या अपहार प्रकरणाची माहिती घेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यानंतर शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर, शेखर चरेगावकर यांच्याकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. या चौकशीनंतर आता या प्रकरणातील 27 जणांना ईडीने नोटीस बजावली आहेत. यात आजी-माजी संचालक तसेच चरेगावकर यांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासाला गती दिली असून पुढील कारवाईबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.