

भोर: पंढरपूर- शिंदेवाडी- भोर- महाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर असताना भोर नगरपरिषदेने महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याबाबत मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या आहेत. मात्र, रस्त्यासाठी गेलेल्या जागेचा मोबदला अद्याप मिळालेला नसल्याने रामबाग ते महाड नाका परिसरातील नागरिकांनी तीव नाराजी व्यक्त केली आहे. या मागणीसाठी नागरिकांनी शुक्रवारी (दि. 26) भोर मुख्याधिकारी गजानन शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) ते वरंधा घाट-महाड हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून, या मार्गाचे सिमेंट काँक्रीटचे काम सध्या सुरू आहे. या महामार्गाच्या भोर नगरपरिषदेच्या हद्दीतील रामबाग ते महाड नाका या टप्प्यातील अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. रस्त्याच्या हद्दीपासून इमारत रेषा व नियंत्रण रेषा 3 ते 6 मीटर अंतरावर असणे बंधनकारक असल्याने या मर्यादेतील अतिक्रमणे हटविण्याचा उल्लेख नोटिसांमध्ये करण्यात आला आहे.
मात्र, या परिसरातील अनेक रहिवाशांना रस्त्यासाठी गेलेल्या जागेचा मोबदला अद्याप मिळालेला नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. चौपाटी व रामबाग परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी गजानन शिंदे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. या वेळी संजय गोळे, चंद्रकांत राजीवडे, युवराज शेटे, सविता कोठावळे, नीलेश देशमाने, शुभम शेटे, बाळासाहेब देशमाने, प्रसाद देशमाने आदी उपस्थित होते. नागरिकांनी सांगितले की, काही घरे 100 वर्षांहून अधिक जुनी असून राष्ट्रीय महामार्गाच्या आखलेल्या सीमारेषेमुळे ती पाडण्याची वेळ येणार आहे.
तसेच काही ठिकाणी रस्त्यासाठी जागा अधिग््राहित करण्यात आली असली तरी त्याचा मोबदला मिळालेला नाही. शिवाय प्रॉपर्टी कार्डमध्ये संबंधित जागा अद्याप नागरिकांच्याच नावावर असल्याचे दिसून येते. जर मोबदला देण्यात आला असेल, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाव प्रॉपर्टी कार्डवर का नोंदवले गेले नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मोबदला दिला असल्याचे पुरावे असल्यास त्याची कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
नागरिकांच्या तक्रारी राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांसमवेत संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल.
गजानन शिंदे, मुख्याधिकारी, भोर नगरपरिषद