Water supply by tankers in Satara district during monsoon.
सातारा जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात टँकरने सुरू असलेला पाणी पुरवठा. Pudhari Photo
सातारा

जिल्ह्यातील 136 गावांत पाणीटंचाई

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यातील 23 गावे व 113 वाड्यांमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात सुमारे 20 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या गावात पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने पाण्याची आणखी भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला. तसेच तीव्र उन्हाळ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट निर्माण झाली होती. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. मात्र त्यानंतरही पावसाने म्हणावा तसा जोर पकडलाच नाही. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा अपेक्षित वाढत नसल्याने पाणीपुरवठा करणारे टँकर पूर्णत: बंद झालेले नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टँकरची संख्या 218 वर गेली होती; मात्र पावसामुळे टँकरच्या संख्येत घट होत आहे.

माण तालुक्यात मोही, डंगिरेवाडी, शेवरी, राणंद, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, खडकी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वाकी अशी 17 गावे व 112 वाड्यांमधील 42 हजार 175 नागरिकांना 14 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खटाव तालुक्यातील शिंदेवाडी, नवलेवाडी, गारळेवाडी अशा 3 गावे व एका वाडीमधील 2 हजार 20 नागरिक व 996 जनावरांना

2 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथील 3 हजार 278 नागरिक व 3 हजार 142 जनावरांना दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खंडाळा तालुक्यातील निंबोडी येथील 226 नागरिक व 351 जनावरांना एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाई तालुक्यातील आनंदपूर येथील 409 नागरिक व 185 जनावरांना एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी 11 विहिरी व 3 कूपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

SCROLL FOR NEXT