सातारा : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी भक्कम गडकिल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभ्या असलेल्या या गडकिल्ल्यांंवर आता लवकरच ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटणार आहे. महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा ‘युनेस्को’ च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश व्हावा, यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे. या यादीत महाबळेश्वरच्या किल्ले प्रतापगडचा समावेश आहे. ‘युनेस्को’चे पथक या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी पुढील महिन्यात महाराष्ट्र दौर्यावर येण्याची शक्यता आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्यांची नोंद झाल्यानंतर सगळ्या जगाला शिवरायांच्या थोरवीची नव्याने ओळख होईल. जगभरातले पर्यटक या किल्ल्यांना भेटी देतील. युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ले संवर्धनासाठी मदत करू शकेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केले, तर इतिहासातले नवे दुवे सापडू शकतील. मराठा लष्करी वास्तुसंरचना या प्रकारात राज्य पुरातत्त्व विभागाने 12 किल्ल्यांच्या शृंखलेचा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रतापगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 तसेच तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यांचा समावेश आहे. या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी युनेस्कोचे पथक पुढील महिन्यात महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत. हे पथक प्रतापगड किल्ल्याला भेट देण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यानुसार तयारी सुरू केल्याचे समजते.
जागतिक वारसा स्थळांच्या प्रस्तावांवर विचारमंथन आणि ध्येयधोरणांच्या निश्चितीसाठी भरवण्यात आलेल्या ’युनेस्को’च्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या प्रतिकृती आकर्षण ठरल्या आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिले आहे. वारसास्थळ अभ्यास समितीने प्रस्ताव स्वीकारला असून वर्षभरात प्रत्यक्ष मूल्यांकन, सर्वेक्षण प्रक्रिया होणार आहे. या निमित्ताने बैठकीच्या आवारात ‘इनक्रेडिबल इंडिया’ हे प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये प्रस्तावित 11 किल्ल्यांच्या मोठ्या प्रतिकृती आणि त्या किल्ल्यांचा इतिहास मांडण्यात आला. बैठकीसाठी 190 हून अधिक देशांचे प्रतिनिधी आले असल्याने या सगळ्यांना महाराष्ट्रातील किल्ल्यांची भव्यता प्रतिकृतीच्या माध्यमातून बघायला मिळाली.
युनेस्कोच्या अभ्यासकांचे पथक किल्ल्यांच्या मूल्यमापनासाठी येणार असल्याचे औचित्य साधून पुरातत्व विभागातर्फे दुर्गसंंवर्धनाच्या दृष्टीने विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रतापगड, रायगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यांची प्रतिकृती असली तरी हुबेहूब किल्ले तयार करण्यात आले आहेत. ते सध्या शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आले असून दोन महिन्यात सातारकरांना हे पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहेत.