प्रतापगड परिसरात भात लावणीला वेग

प्रतापगड परिसरात भात लावणीला वेग
Published on
Updated on

प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा : किल्ले प्रतापगड हे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेले, हिरव्यागार वनराईने नटलेले आणि निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केलेले जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असून सध्या पुरेसा पाऊस पडल्याने महाबळेश्‍वर तालुक्यात भलरी गात पारंपरिक भात लावणीला वेग आला आहे.

या तालुक्यात पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी, सतत पुरस्थिती निर्माण करणारी महाराष्ट्राची जीवनवाहिनी कोयनामाई असली तरी उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी डोईवर भांडी घेऊन अनेक कोसांची पायपीट करावी लागते, अशी टोकाची विषम इथली स्थिती.अशा स्थितीतही निसर्गाशी हातमिळवणी करून आपली उपजीविका करणारे येथील शेतकरी डोंगर उतारावर जागा मिळेल तेथे पारंपारिक भाताचे वाण, नाचणी, वरी अशा सात्त्विक पिकांची लागवड करतात. केवळ पावसाच्या पाण्यावर तग धरणारी ही पिके तितकीच कसदार आणतात. झाडांचा पाला, गवत आणि कचरा जाळून त्यावर मृग नक्षत्रात पेरणी केली जाते. आषाढ महिन्यात भात रोपांची जोमदार वाढ झाल्यावर सह्याद्रीच्या डोंगर उतारावर त्यांची लागवड केली जाते.

आता काळाच्या ओघात मात्र परिस्थिती बदलली असून ही पारंपारिक शेती नामशेष होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. नोकरी, व्यवसायासाठी येथील कष्टकरी, तरुण शहरांमध्ये गेल्याने गावे ओस पडू लागली आहेत. तरीही उर्वरीत शेतकरी पारंपारिक शेतीचा बाज सांभाळत नाचणी, वरी, भात पिके पिकवत असून सध्याही या भागात पुरेसा पाऊस पडल्याने भलरी गात जोमदारपणे भात लावण करत आहेत.

बैलांच्या गळ्यातील घंटांचा मंजूळ नाद

कुठे बैलांच्या गळ्यातील घंटांचा मंजूळ नाद तर कुठे शेतकरी महिलांची पारंपारिक भलरी गीते भातरोपांची लावण करताना ऐकू येत आहेत. कोयनामाईच्या दोन्ही तीरांवर निसर्गाच्या सहवासात हे आनंदगाणे गाताना त्यांना कष्टाची यत्किंचितही तमा नसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news