सातार्‍यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांचे अनावरण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. सुधीर मुनगंटीवार, ना. शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील.  Pudhari Photo
सातारा

वाघनखांनी विरोधकांच्या बुद्धीचा गंज काढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : वाघनखं खोटी म्हणणार्‍यांकडून शिवरायांच्या शौर्याचा अपमान

पुढारी वृत्तसेवा

ब्रिटनवरून शेकडो मैलांचा प्रवास करून सातारा राजधानीत दाखल झालेली शिवरायांची वाघनखं ही शिवप्रेमींचा अभिमान आहेत. मात्र, आमचे विरोधक ही वाघनखं खोटी आहेत, असं म्हणून शिवरायांच्या अतुलनीय शौर्याचा अपमान करत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी मला भेट म्हणून दिलेल्या वाघनखांनी विरोधकांच्या बुद्धीचा गंज मी काढणार आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आयोजित शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. महेश शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. राजेंद्र राऊत, वृषालीराजे भोसले,

भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, मनोज घोरपडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ब्रिटन येथील आंतरराष्ट्रीय व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमचे प्रमुख निकोलस मर्चंट, पुरातत्व विभागाचे सुनीलकुमार उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर आदिलशहाचा सरदार अफजलखानाचा याच वाघनखांनी कोथळा बाहेर काढला. शिवरायांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी हा अतुलनीय पराक्रम करुन विरोधी सत्तांवर दहशत बसवली. भूतकाळाचा धागा वर्तमानाशी जोडण्याच्या अनुषंगाने ब्रिटनवरुन भारतात आणलेली वाघनखं कारणीभूत ठरली आहेत. इतिहासाचा पट बदलणारी ही वाघनखं आहेत. शिवरायांच्या पराक्रमातून प्रेरणा घेतलेल्या मराठा बटालियनने कुपवाडा येथे पाकिस्तानच्या सीमेवर छ. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारला आहे.

नकली वाघांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना नकली वाघनखे म्हणणार्‍या नकली वाघांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे नेतेही नकली आणि तेही नकली, असा टोला लगावला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र आणि शिवप्रेमी ज्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहात होता, तो ऐतिहासिक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं सातार्‍यात आणण्यात आली आहेत. त्याचा अनावरण सोहळा पार पडला असून तो आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. आजपासून सात महिने ही वाघनखे पाहण्यासाठी खुली करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

खा. उदयनराजेंच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची निर्मिती

प्रतापगड किल्ल्याच्या विकासासाठी प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून या प्राधिकरणाला 150 कोटींचा निधी राज्य सरकारने दिला आहे. याचा शासन आदेशही काढल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराणी ताराराणींच्या समाधीचा जीर्णोद्धार करणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा महाराणी ताराराणी यांची संगममाहुली येथे समाधी आहे. या समाधीचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी राजघराण्यासह शिवप्रेमींकडून वेळोवेळी केली गेली आहे. आता या समाधिस्थळाचा जीर्णोद्धार राज्य सरकारमार्फत केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT