सातारा जिल्ह्यात उडणारे ड्रोन कुणाचे याचा सुगावाच नाही file photo
सातारा

सातारा जिल्ह्यात उडणारे ड्रोन कुणाचे याचा सुगावाच नाही

पुढारी वृत्तसेवा

खटाव : अविनाश कदम

खटाव, माण तालुक्यासह सातारा व इतर जिल्ह्यात रात्री अपरात्री घिरट्या घालणार्‍या ड्रोन्समुळे जनजीवन चिंतित झाले आहे. तर्कवितर्कांना उधाण येवून जनता भयभीत झाली आहे. घिरट्या घालणार्‍या ड्रोन्समुळे अद्याप कोणताही गुन्हा घडला नसल्याचे सांगितले जात असले तरी ड्रोन्स फिरणार्‍या भागात पोलिसांचीही तारांबळ उडत आहे. रात्री फिरणारे ड्रोन्स कुणाचे आणि कशासाठी फिरवले जात आहेत याचा सुगावा अद्याप लागलेला नाही. हे पोलिसांचे अपयशच म्हणावे लागणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पोलिसांनी ड्रोन प्रकरणाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून रात्री अपरात्री ड्रोन फिरत असल्याच्या घटना घडत आहेत. तेच लोण आता खटाव, फलटण तालुक्यात सुरु झाले आहे. शेजारील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात अशाच घटना घडत आहेत. पोलिसांनी शोध घेऊनही अद्याप ड्रोनचे रहस्य उलगडलेले नाही. दिवसा उडणारे ड्रोन विविध पाणी योजनांचे सर्वेक्षण करण्यासाठी उडवले जात असल्याची माहिती सिंचन विभागाकडून देण्यात आली आहे. या कामासाठी वापरण्यात येणारे ड्रोन रात्री उडवले जात नाहीत हेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शासकीय कामाचे ड्रोन रात्री उडवले जात नसतील तर सातार्‍यासह आसपासच्या जिल्ह्यात घिरट्या घालणारे ड्रोन कुणाचे आणि कशासाठी उडवले जात आहेत याचे गूढ वाढले आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाहीत. बहुतांश पोलिस ठाण्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असणार्‍या ड्रोन मालकांच्या बैठका घेऊन सुचना दिल्या आहेत. त्यांच्यापैकी कुणीही रात्री ड्रोन उडवत नाही अशी माहिती देण्यात आली आहे. तरीही रात्री मोठ्या प्रमाणावर ड्रोन उडवले जात आहेत.

रात्री अपरात्री घिरट्या घालणार्‍या ड्रोनमुळे अफवांचे पिक फोफावत आहे. नागरिक भयभीत होत आहेत. दरोडे, खून, सायबर गुन्ह्यात पोलिस अत्याधुनिक यंत्रणा वापरतात, मग या ड्रोन प्रकरणात का वापरत नाहीत असा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होत आहे. भयभीत वातावरण निर्मिती करणार्‍या ड्रोन प्रकरणाचा पोलिसांनी सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे.

अ‍ॅन्टी ड्रोन गनचा वापर शक्य...

संवेदनशील ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडवल्यास सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडते. अशा वेळी अ‍ॅन्टी ड्रोन गनद्वारे संशयास्पद ड्रोनवर ठराविक वारंवारतेच्या साह्याने नियंत्रण मिळवता येते. संशयास्पद ड्रोनचा त्याच्या मूळ यंत्रणेशी असलेला संपर्क तोडून ते आहे तिथेच लँड करता येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणी अशी गन वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशी अ‍ॅन्टी ड्रोन गन वापरुन रात्री घिरट्या घालणार्‍या ड्रोन्सचा बंदोबस्त करायला हवा अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT