Beed News
बीड जिल्ह्यात 'ड्रोन'ची हवा Pudhari Photo

बीड जिल्ह्यात 'ड्रोन'ची हवा

कृषी महोत्सवात विमान ठरतेय आकर्षण...
Published on

प्रा.रविंद्र जोशी

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून  रात्री घिरट्या घालणाऱ्या ड्रोनचा विषय चर्चेचा ठरला आहे. हे ड्रोन नेमके का व कशाचे? याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र प्रशासनाने कोणीही घाबरून जाण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात सध्या या ड्रोनचा विषय गाजत असताना परळीत मात्र दुसऱ्याच एका ड्रोनची चर्चा होत आहे. 

परळी वैजनाथ येथे राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पाच दिवस कृषी महोत्सव होते. लोकांचा प्रतिसाद पाहून आणखी एक दिवस वाढवण्यात आले आहे. कृषी विभागाने सोमवार पर्यंत ( दि. २६)  मुदतवाढ दिली आहे.

या कृषी महोत्सवात विविध कृषीविषयक स्टॉल्स लावण्यात आले असुन, अत्याधुनिक उपकरणे, विविध प्रकारची औजारे, शेती विषयक विविध तंत्रज्ञानांबाबत माहिती देणारे स्टॉल्स, शेतीपूरक व्यवसायासंबंधीचे स्टॉल्स, शेती उत्पादनांमधून गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन, पशुप्रदर्शन, रानभाजी महोत्सव अशा विविध प्रकारच्या स्टॉल्स आहेत.

 कृषी महोत्सवात विमान ठरतेय आकर्षण...

दरम्यान, या कृषी महोत्सवात परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने अत्याधुनिक औजारे व शेतीसाठी उपयुक्त ड्रोनचे प्रात्यक्षिक व माहिती देणारा स्टॉल लावण्यात आला आहे. हा स्टॉल शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त ठरणारा ड्रोन कृषी विमान या नावाने प्रसिद्ध होताना दिसत आहे. या ड्रोन द्वारे शेतीतील फवारणीची कामे कमी वेळात, कमी औषधात व समप्रमाणात फवारणी करण्यासाठी उपयोगी असल्याचे कृषी विद्यापीठाचे कृषी अधिकारी सांगत आहेत. आधुनिक शेतीमध्ये ड्रोनचा जास्तीत जास्त उपयोग करून शेतकरी कमी वेळात, विना धोका व कमी खर्चात समृद्ध शेती करू शकतो अशी माहिती कृषी अधिकारी देत आहेत.

या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी एक ड्रोनही उपलब्ध करण्यात आलेला असून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून दिवसभर या ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे.

अधिकाधिक शेतक-यांनी वापर करावा...

शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस व फळबागांच्या फवारणीसाठी ड्रोनने फवारणी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी हरियाणाच्या एका कंपनीबरोबर करार करून ड्रोन उपलब्ध केले आहेत. भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना फवारणीसाठी हे दिले जातात. केवळ पाचशे रुपये भाड्याने शेतकऱ्यांना हे ड्रोन उपलब्ध केले जातात. दहा ते पंधरा मिनिटात एकरी फवारणी या द्वारे होते. शेतकऱ्यांना स्वयंरोजगारासाठीही हे क्षेत्र खुले असून ज्याप्रमाणे ट्रॅक्टरचा उपयोग करून आपण आपल्या भागातील शेतकऱ्यांना सेवा देतो. त्याचप्रमाणे युवा शेतकरी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन आपल्या आपल्या भागात ड्रोन द्वारे शेतीची कामे करून स्वयंरोजगार मिळवू शकतात. शासनाच्या अनेक प्रोत्साहनपर योजना ड्रोनच्या वापराबाबत असुन याचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.

स्मिता सोळंके (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news