राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ‘Chh.ShivendraRaje Bhonsle’ हे अधिकृत फेसबुक पेज दिनांक २९ मे २०२५ रोजी रात्री अज्ञात हॅकरने हॅक केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकाराची रितसर तक्रार सातारा पोलीसांच्या सायबर सेलकडे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आली आहे. संबंधित हॅकरवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली असून, सध्या हॅकरचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या हॅक झालेल्या पेजवर कोणतीही अनधिकृत किंवा आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे. अशा कोणत्याही पोस्टसाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले किंवा त्यांच्या कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, ऑगस्ट २०२३ मध्ये देखील हे पेज हॅक करण्यात आले होते. त्यानंतर सातारा सायबर सेलच्या प्रयत्नांमुळे काही महिन्यांत पेज पुन्हा रिकव्हर करण्यात आले आणि त्यावर अधिकृत माहिती जनसंपर्क कार्यालयामार्फत प्रसिद्ध केली जात होती.
या पेजवर ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यक्रम, बातम्या, तसेच चालू घडामोडींची अधिकृत माहिती नियमितपणे प्रसारित केली जात होती. त्यामुळे या पेजचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आणि फॉलोअर्स आहेत.
हॅक झालेल्या या फेसबुक पेजवरील कोणतीही माहिती, पोस्ट, किंवा मजकूर हा अधिकृत नसून तो हॅकरने टाकलेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते, चाहत्यांनी अथवा सर्वसामान्य नागरिकांनी अशा पोस्टकडे कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असे पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे.