Satara News : साताऱ्याच्या सुपुत्राने आसाममध्ये लावला नवीन पालीचा शोध  File Photo
सातारा

Satara News : साताऱ्याच्या सुपुत्राने आसाममध्ये लावला नवीन पालीचा शोध

जैवविविधतेने समृद्ध परिसरात आढळली पाल; डॉ. अमित सय्यद व त्यांच्या टीमने केले संशोधन

पुढारी वृत्तसेवा

Satara's son invented the new lizard in Assam

सातारा : सागर गुजर

भारतीय आणि इंडोनेशियन वन्यजीव शास्त्रज्ञांनी आसाममध्ये नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लावला आहे. उत्तरपूर्व भारतातील जैवविविधतेने समृद्ध आणि घनदाट परिसरात ही पालीची नवी प्रजात आढळली. भारतीय व इंडोनेशियन संशोधकांच्या टीमने हा शोध लावला आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी व ब्रीदलाईफ बायोसायन्सेस फाऊंडेशनचे प्रमुख व साताऱ्याचे सुपुत्र डॉ. अमित सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन पार पडले.

सरीसृपांच्या जैवविविधतेच्या अभ्यासात एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. इंडोनेशियातील सरीसृप तज्ज्ञही या शोधाचा भाग आहेत. या शोधामुळे भारतातील सरीसृप जैवविविधतेत मोलाची भर पडली आहे. निम्यासपिस वंशाच्या उत्क्रांतीशास्त्रीय आणि जैवभौगोलिक अभ्यासातही नवे दालन खुले झाले आहे.

ही नवीन प्रजाती निम्यासपिस पुदियाना प्रजाती समूहाशी संबंधित असून पूर्वी हा समूह केवळ श्रीलंकेत आढळतो, असे मानले जात होते. ही केवळ दुसरी प्रजाती आहे, जी भारताच्या भूमीत आढळली आहे. त्यामुळे हिचा शोध पुदियाना गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या आधीपर्यंत या गटातील निम्यासपिस पुदियाना, निम्यासपिस मोलिगोडाई आणि निम्यासपिस मनोई या प्रजाती केवळ श्रीलंकेतच आढळल्याची नोंद आहे.

निम्यासपिस ब्रह्मपुत्रा ही नवीन प्रजाती निम्यासपिस आसार्मेसीसशी समरूप वाटत होती आणि भारतात पुदियाना या समूहातील एकमेव पाल असल्याने ही निदर्शनात आली नव्हती. परंतु, शास्त्रज्ञांनी तिचा बारकाईने अभ्यास करून तिची काही ठळक वैशिष्ट्ये शोधून काढली. त्याचबरोबर त्याचे डीएनए अभ्यासले व माइटोकॉन्ड्रियल एनडी २ जनुकावर आधारित विश्लेषण केले.

यामध्ये ही नवीन पाल निम्यासपिस आसार्मेसीसपासून ७.३ ते ७.५ टक्के आणि श्रीलंकेतील प्रजातींपासून २१.२ ते २४.८ टक्के इतका अनुवांशिक फरक आढळून आला, ब्रह्मपुत्रा नदीवरून 'निम्यासपिस ब्रह्मपुत्रा' असे नाव ही नवीन पाल आसाममधील नॉर्थ गुवाहाटी परिसरात, ब्रह्मपुत्रा नदीच्या प्राचीन दरीत आढळली. ही नदी पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सातत्याने वाहणाऱ्या नदी प्रणालींपैकी एक आहे. यामुळेच पालीचे नाव 'निम्यासपिस ब्रह्मपुत्रा' असे ठेवले आहे.

पालीची ही आहेत वैशिष्ट्ये

या लहानशा दिसणाऱ्या पालीची लांबी फक्त ३०.८ ते ३५.७ मिमी आहे. ती जमिनीवर तसेच दगडावर राहणारी आणि दिवसा सक्रिय असणारी प्रजाती आहे. तिच्या शरीरात काही विशिष्ट वैशिष्ट्ये असून ती आपल्याला या वंशाच्या उत्क्रांतीबाबत महत्त्वाची माहिती देणारा शोध ठरणार आहे. निम्यासपिस पुदियाना हा गट पालीच्या गेकोनीड कुटुंबातला असून या पाली सहसा दगडी भाग, तसेच दाट जंगलांमध्ये आढळतात आणि त्यांच्या पुरातन वंशपरंपरेमुळे वैज्ञानिकांच्या विशेष अभ्यासाचा विषय ठरला आहे.

हा शोध केवळ टॅक्सोनॉमिक यश नाही, तर तो जैवविविधतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उलगडा आहे, ज्यामुळे काही प्रजाती कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशांत विभक्त झाल्या आणि पसरल्या, हे दाखवतो. हा वैज्ञानिक शोध जगभरातील संशोधकांकडून स्वागतार्ह मानला जात आहे आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दाराला चालना देणारा ठरू शकतो.
डॉ. अमित सय्यद, ब्रीदलाईफ बायोसायन्सेस फाऊंडेशनचे प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT