

सातारा : गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असताना, सार्वजनिक गणेश मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी लगबग सुरू केली आहे. मात्र, अनेक मंडळे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेताच पावती पुस्तके छापून देणग्या स्वीकारत आहेत. ही बेकायदेशीर कृती त्यांना महागात पडू शकते, कारण अशी मंडळे आता धर्मादाय आयुक्तांच्या रडारवर आली असून, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील गल्लीबोळांत लहान-मोठ्या मंडळांचे कार्यकर्ते पावती पुस्तके घेऊन फिरताना दिसत आहेत. मात्र, जेव्हा एखादा देणगीदार परवानगी किंवा हिशोबाबद्दल विचारणा करतो, तेव्हा उत्सवानंतर सर्व हिशोब देऊ, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. काही मंडळांचे सदस्य तर हिशोब मागणार्या नागरिकांकडे जाणेच टाळत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे मंडळांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि देणगीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कायद्यानुसार, मंडळांनी केवळ वर्गणी गोळा करणे अपेक्षित नसून, त्याचा हिशोब सादर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
विनापरवाना वर्गणी गोळा करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. एखाद्या मंडळाने जमा केलेल्या निधीचा गैरवापर केल्यास किंवा हिशोब देण्यास नकार दिल्यास, त्यांच्याविरोधात धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल करता येते. अशा तक्रारीनंतर, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 च्या कलम 66 (क) अंतर्गत संबंधित मंडळावर कारवाई केली जाते. यामध्ये तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा परवानगीशिवाय गोळा केलेल्या एकूण रकमेच्या दीडपट दंडाची तरतूद आहे. त्यामुळे मंडळांनी ही प्रक्रिया गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
ज्या मंडळांनी कायदेशीर परवानगी घेतली आहे, त्यांनाही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. उत्सवानंतर दोन महिन्यांच्या आत त्यांना आपला लेखा परीक्षण अहवाल धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करावा लागतो. या सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करणे हे मंडळांच्या हिताचे आहे, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
परवानगीसाठी सात किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांनी मिळून ठराव घेणे गरजेचे आहे. या सदस्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड, ज्या जागेवर स्थापना करावयाची आहे त्या जागा मालकाचे परवानगी पत्र, वीज मंडळाचे ना हरकत पत्र किंवा छोट्या मंडळांसाठी ज्या घर मालकांकडून वीज घेण्यात आली आहे, त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र, वीजबिल, मागील वर्षीचा गणेशोत्सव हिशोब आदी कागदपत्रे गोळा करून अर्जातील माहिती भरून ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज सादर केल्यास 3 दिवसांत परवानगी मिळेल.