

सातारा : पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या धोरणामुळे कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि वराहपालन करणार्या पशुपालकांना कर्ज, विमा आणि सोलर सुविधांसह शेतीसारख्या सवलती मिळणार आहेत. यामुळे उत्पादनात वाढ, आर्थिक स्थैर्य आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
राज्य शासनाने पशुपालन व्यवसायाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पशुपालन हा आता केवळ दुय्यम व्यवसाय न राहता शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून समोर येणार आहे. या निर्णयामुळे उत्पादनात वाढ, आर्थिक स्थैर्य आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल. तसेच शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
या निर्णयाअंतर्गत पशुसंवर्धन व्यवसायाला शेतीप्रमाणेच कर्जावरील व्याजदारात सवलत मिळणार आहे. याशिवाय सोलर पंप आणि इतर सोलर संच उभारण्यासाठी विशेष सवलती उपलब्ध होणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर कर आकारणीमध्ये एकसमानता आणण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी व्यवसायाच्या दराने कर आकारले जाणार आहे. या सुविधामुळे पशुपालकांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करणे सोपे होईल आणि उत्पादन खर्च कमी होईल. हा निर्णय दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आणि वराहपालन या व्यवसायाशी संबंधित पशुपालकांना लागू होणार आहे.
विशेषत: 25 हजार मांसल कुक्कुट पक्षी, 50 हजार अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी क्षमतेच्या आणि 45 हजार क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायांना याचा थेट लाभू होईल. याशिवाय 100 दुधाळ जनावरांचे संगोपन, 500 मेंढी शेळीपालन आणि 200 वराह पालन करणार्या पशुपालकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी सांगितले.