कराड ः पुणे - बंगळूर महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर खोडशी परिसरात अज्ञान वाहनाने धडक दिल्याने वायरमनचा मृत्यू झाला आहे. तर कराड शहरातील वाखाण परिसरात दुचाकीने धडक दिल्याने जखमी झालेल्या शेतकऱ्याचे निधन झालेे. दोन्ही घटनांची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सायंकाळपर्यंत सुरू होती.
अधिक ज्ञानू जाधव (वय 67, रा. मंगळवार पेठ, कराड) असे शेतकऱ्याचे तर अजित अर्जुन जाधव (वय 28, रा. पाडळी-केसे, ता. कराड) असे वायरमनचे नाव आहे. अधिक जाधव हे वाखाण परिसरातील सनद नावाच्या शिवारातील शेताकडेला बसले होते. त्यावेळी भरधाव दुचाकीची त्यांना धडक बसली. या धडकेत गंभीर जखमी जाधव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. पोलिसांनी अपघातातील दुचाकीसह चालकास ताब्यात घेतले आहे. दुसरा अपघात बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पुणे - बंगळूर महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर झाला आहे. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अजित जाधव यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने वाहनासह पलायन केले.