

देवरूख : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील करंजरी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सुमारास 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गावर पडलेल्या मृत सांबराची माहिती मिळताच वन विभागाने त्वरित हालचाली सुरू केल्या.
परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांच्यासह दाभोळे येथील वनरक्षक सुप्रिया काळे, साखरपाचे सहायक वनरक्षक सहयोग कराडे, फुणगूसचे आकाश कडुकर आणि आरवलीचे सूरज तेली यांनी घटनास्थळी भेट देत मृत सांबराची पाहणी करून पंचनामा केला.
या अपघातात धडक देणारे वाहन अद्याप अज्ञात असून, संबंधित चालकाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून आवश्यक कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. वन्यप्राणी संरक्षणाच्या दृष्टीने महामार्गांवर वेगमर्यादा पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.