सातारा : सातारा तालुक्यातील आरे गावचे जवान प्रमोद जाधव यांच्या अपघाती निधनाची वार्ता वाऱ्यासारखी देशभर पसरली. या घटनेची ट्रॅजेडीही तशीच वेदनादायी अशीच ठरली. पत्नी प्रसुत होती...आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकण्यासाठी प्रमोद व्याकुळ झाले होते. पण बाळाचा आवाज कधी कानठळ्या बसणाऱ्या आक्रोशात रुपांतरित झाला, हे देखील कळाले नाही. प्रमोद यांच्या पत्नीसह त्यांच्या कुटुंबीयांच्या ओक्साबोक्सी रडण्याने संपूर्ण देशवासीय हळहळले...पण या दु:खाच्या खाईत लोटलेल्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री अद्यापही फिरकले नाहीत. जवानाच्या कुटुंबाबद्दल लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या अनास्थेमुळे सामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
आपण बाप होणार या आनंदात लष्करात सेवेत असलेले जवान प्रमोद जाधव हे एक महिन्याची सुट्टी घेवून गावी आले होते. पत्नीला प्रसुतीसाठी साताऱ्यातील साई नर्सिंग होम येथे दाखल केले होते. त्यांची प्रमोद विशेष काळजी घेत होते. त्यातच खासगी कामानिमित्त ते साताऱ्यातील वाढे फाटा परिसरात निघाले असतानाच त्यांच्या दुचाकीला मोठा अपघात झाला. त्यात प्रमोद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पतीला अखेरचा निरोप देण्यासाठी नवजात बाळाला सोबत घेवून स्ट्रेचरवरच ओली बाळंतीण स्मशानभूमीत दाखल झाली. एका बाजूला वीर पित्याचा मृतदेह...शेजारी एका दिवसाचे त्याचे बाळ अन् भविष्यातील सुन्न अंधारात हरवलेली वीर पत्नी असे चित्र पाहून उपस्थितांना गलबलून आले.
10 जानेवारी ही घटना घडली. अन त्याच दिवशी त्यांच्या पत्नीने गोंडस अशा मुलीला जन्म दिला. मात्र, आपल्या मुलीचा चेहराही प्रमोद यांना पाहता आला नाही. दरम्यान, हे दु:ख एका कुटुंबाचं नाही तर समस्त देशवासियांचं हे दु:ख आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील, परळी खोऱ्याचे नेते राजूभैया भोसले यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून वीर जवानाच्या कुटुंबाला धीर दिला.