

सातारा : पत्नी ऋतुजाच्या प्रसुती आनंदासाठी व येणाऱ्या बाळाच्या पहिल्या रडण्याचा साक्षीदार होण्यासाठी प्रमोद देशाच्या सीमेवरुन घरी आला पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. रात्री एका भीषण अपघाताने त्याचा श्वास थांबला आणि काही तासांतच घरी कन्यारत्नाचा जन्म झाला. ज्या डोळ्यांतून लेकीच्या स्वप्नांची पहिली झलक पहायची होती, ते डोळे कायमचे मिटले. वडिलांच्या कुशीत खेळण्याआधीच ती चिमुकली पोरकी झाली. एकीकडे घरात पाळणा हलला अन् त्याचवेळी दुसरीकडे स्मशानात चिता पेटली होती. आनंद आणि दुःख यांचं असं भयाण वास्तव काळीज पिळवटून गेलं.
दरे, पो.आरे ता.सातारा येथील भारतीय सैन्य दलात जवान असलेले प्रमोद जाधव (वय 32) यांच्या अपघाती मृत्यूने ह्रदयाचा ठाव चुकला. नियती किती निर्दयी असते याचा प्रत्यय आला. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सज्ज असलेला जवान प्रमोद सुट्टीवर घरी आला तेव्हा काळाने त्याच्यावर घातलेला घाला अन् उघड्यावर पडलेलं कुटुंब सारंच ह्रदयाला डागण्या देणारं. प्रमोदच्या जाण्यानं संपूर्ण दरे गाव शोकसागरात बुडालं असून, देशासाठी जगणारा जवान कुटुंबासाठी मात्र वेळेआधीच हिरावला गेला, अशी हळहळ प्रत्येकाच्या मनात दाटून आली.
प्रमोद जाधव 2014 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सध्या त्यांची नियुक्ती लडाख (जम्मू, काश्मीर) येथे होती. पत्नी गर्भवती असल्याने तिच्या प्रसुतीसाठी ते 1 महिन्याची सुट्टी काढून गावी दि. 1 जानेवारी रोजी आले होते. पत्नीला प्रसुतीसाठी साताऱ्यातील साई नर्सिंग होम येथे दाखल केले होते. आपण बाप होणार या कल्पनेने प्रमोद उताविळ झाले होते. साताऱ्यात आल्यापासून पत्नीची संपूर्ण काळजी ते घेत होते.
मात्र नियतीने सारंच बिघडवलं. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रमोद कामानिमित्त वाढे फाटा रस्त्यावरुन जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. जवान प्रमोद हे एकुलते एक होते. त्यांच्या कुटुंबिय, नातेवाईक व मित्र परिवाराला ही बातमी समजल्यानंतर ते हादरुन गेले. प्रमोद यांच्या पत्नीला प्रसुतीसाठी दाखल केले होते, कोणत्याही क्षणी गोड बातमी येणार होती. असे असतानाच ही ह्रदयद्रावक घटना घडली. त्यामुळे प्रमोदचा मृत्यू झाल्याचे पत्नीला सांगण्यात आले नव्हते. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रमोद यांना कन्यारत्न झाले. मात्र मुलीचे तोंड पाहण्याआधीच पित्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने हा परिवार तसेच परळी खोरं अक्षरश: गहिवरुन गेलं, गलबलून गेलं. प्रत्येक जण हळहळला.