

सातारा : छोटा हत्ती व दुचाकीचा शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव (वय 32, रा. दरे, पो. आरे, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते सुट्टीवर आले होते. त्यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच गोड कन्येचा जन्म झाला. एकीकडे कन्येचे आगमन अन् दुसरीकडे पित्याचा मृत्यू या घटनेमुळे समाजमन गलबलून गेले.
सातारा-लोणंद रस्त्यावरील पुरुष भिक्षेकरी गृहासमोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. छोटा हत्तीवरील चालक संदीप बबन शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सौरभ अर्जुन जाधव (वय 26, रा. दरे पो. आरे) यांनी अपघात प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जवान प्रमोद जाधव हे दुचाकीवरुन जात असताना छोटा हत्ती या वाहनाची धडक त्यांना बसली. ही धडक एवढी गंभीर होती की जवान प्रमोद जाधव यांच्या डोक्याला, पायाला दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. अपघाताची माहिती जाधव कुटुंबियांना मिळाल्यानंतर ते रुग्णालयात आले. जवान प्रमोद जाधव यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. प्रमोद जाधव यांच्या पश्चात 1 दिवसाची मुलगी, पत्नी व वडील असा परिवार आहे.