सातारा : एकीव धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या काही जोडप्यांवर रविवारी सकाळी मधमाश्यांनी हल्ला केला. या घटनेत सहा ते सात जण जखमी झाले असून प्रथमोपचार केल्यानंतर त्यांनी कल्टी मारली. दरम्यान, या घटनेत कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, रविवारी सकाळी एकीवचा धबधबा पाहण्यासाठी काही युवक-युवती गेले होते. धबधब्याच्या परिसरात पोहोचल्यानंतर जोडप्यांचा दंगा सुरू झाला. फोटोशूट सुरू असताना अचानक मधमाश्या उठल्या. या जोडप्यांसोबत इतर काही पर्यटकही होते. मधमाश्यांनी या सर्वांवर हल्ला केला. मधमाश्या चावू लागल्यानंतर सर्वांची पळापळ झाली व बचावासाठी ते सैरावैरा पळू लागले. मधमाश्यांच्या या हल्ल्याने जोडप्यांना रडकुंडीला आणले.
सुमारे 15 ते 20 मिनिटे मधमाशांच्या हल्ल्यांमध्ये अनेक जोडपी दिसेल त्या रस्त्याने पळत सुटली. सर्व मधमाशा शांत झाल्यानंतरही जोडपी लपून बसलेल्या ठिकाणाहून बाहेर येण्यास धजावत नव्हती. या घटनेची माहिती रेस्क्यू टीमला मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीमने काही जणांना तेथून बाहेर सुखरुप काढले. यानंतर या जोडप्यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत मधमाशांच्या हल्ल्यांमुळे अनेकांच्या तोंडावर, अंगावर चांगलीच सूज आली होती. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. कोणी गंभीर दुखापत नसल्याचे समोर आले. दरम्यान, या घटनेची कुठेही नोंद झालेली नाही. संबंधित जोडप्यांनी आपली ओळख उघड होवू नये, याबाबतची खबरदारी घेतली.