

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातार्यातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या आघाड्यांचे स्वतंत्र स्वागत मंडप उभारले जातात. यावर्षी दोन्ही राजांचा श्री गणेश विसर्जन स्वागत मंडप एकच असावा, असे साकडे सातार्यातील गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी घातले. यासंदर्भात या अध्यक्षांनी दै.‘पुढारी’कडे धाव घेऊन आपली अपेक्षा व्यक्त केली.
सातारच्या गणेश उत्सवाची धामधूम वाढली आहे. देखावे खुले झाले असून, प्रशासन व मंडळांच्या पदाधिकार्यांकडून विसर्जन मिरवणुकीचीही तयारी सुरू झाली आहे. सातार्यात 135 हून अधिक मोठी गणेश मंडळे असून, ही मंडळे गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भव्य विसर्जन मिरवणुका काढतात. या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने
राजवाडा परिसरात खा. उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडी यांचे स्वतंत्र स्वागत मंडप उभारले जातात. आता दोन्ही राजांचे मनोमीलन झाल्यामुळे दोघांसाठी एकच स्वागत मंडप उभारण्यात यावा, अशी मागणी सातार्यातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष करू लागले आहेत. विसर्जन मिरवणुकीवेळी दोन्ही राजांनी एकाच मंडपात येऊन श्री गणेशभक्तांचे स्वागत करावे, अशी भक्तांकडून मागणी होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले हे एकत्र आले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना स्थळावर झालेल्या विराट सभेत दोन्ही राजांचे मनोमिलन झाले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन्ही राजांनी पुन्हा एकत्र यावे व त्यांनी विसर्जन मिरवणुकीत एकच स्वागत मंडप उभारुन गणेशभक्तांना दिलासा द्यावा, ही तमाम सातारकरांची अपेक्षा आहे. यासंदर्भात या मंडळांच्या पदाधिकार्यांनी ‘पुढारी’जवळ आपल्या भावना व्यक्त केल्या.