लोणंद पालखी तळावर सपाटीकरण करण्यात आले असून, माऊलींच्या नीरा स्नानासाठी वीर धरणातून पाणी सोडल्याने नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. pudhari File Photo
सातारा

पालखी सोहळा तयारीची लोणंदनगरीत धामधूम

पुढारी वृत्तसेवा

लोणंद, शशिकांत जाधव

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज झाली आहे. वारकरी व भाविकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. वारकर्‍यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पालखी तळाच्या सपाटीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे.

माऊलींच्या पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम आहे. दि. 6 जुलै रोजी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन होत आहे. दि. 6 व 7 जुलैला लोणंदनगरीत पालखीचा विसावा आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजित पाटील यांनी पालखी तळाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमत: माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या दत्त घाटावर स्नान घालण्यात येते. नीरा स्नानासाठी जाणारा रस्ता बॅरिकेट करण्यात येऊन दत्त घाटाची स्वच्छता करण्यात आली आहे. पाडेगाव या ठिकाणी शौचालयातील व स्नानगृह उभारणीचे काम करण्यात येत आहे. माऊलींच्या पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात आल्यानंतर पाडेगाव ते लोणंद पालखीतळ या पालखी मार्गावरील सर्व खड्डे बुजवणे, रस्त्याच्या बाजूची काटेरी झुडपे काढून स्वच्छता करण्याचे काम बांधकाम विभागाने केले आहेे. त्याचबरोबर लोणंद येथील पालखी तळावर तात्पुरता स्नानगृह, धोबीघाट, स्वच्छतागृह उभारण्याचे काम करण्यात आले आहे. पालखीतळावर एकूण 39 शौचालये व दोन बाथरूमचा वापर केला जाणार आहे.

लोणंदच्या पालखीतळावर मुरूम व कच टाकून त्याचे सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पालखी तळावर पुरेसा उजेड राहण्यासाठी कायमस्वरूपी आठ हाय मास्टर टॉवर उभारण्यात आले आहेत.नगरपंचायतीमार्फत दिंडीच्या ठिकाणी घंटागाडी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा उचलण्याचे काम करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी 14 अ‍ॅम्बुलन्स तसेच एक कार्डियाक अ‍ॅम्बुलन्स ठेवण्यात येणार आहे. पालखीतळावर 24 तास सुसज्ज आरोग्य कक्ष उभारण्यात आला आहे. 25 दुचाकीस्वार फिरते आरोग्यदूत यांची नेमणूक करण्यात आली आहे. लोणंदमध्ये पालखीतळ परिसरात 1500 शौचालय ठेवण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा शुद्धीकरण प्रकल्प, पाडेगाव, लोणंद या ठिकाणी पाणी शुद्धीकरण केले जाणार आहे. पाणी शुद्धीकरणासाठी 200 बॅग टीसीएलचा साठा, 5 टन तुरटी खरेदी करण्यात आली आहे.

धरणातून पाणी सोडल्याने वाढली पाणीपातळी

माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये नीरास्नान घालण्यात येते. नीरा नदीवरील दत्त घाटाची स्वच्छता करण्यात आली आहे. माऊलींचा रथ जुन्या पुलावर थांबल्यानंतर त्या ठिकाणाहून माऊलींच्या पादुकांना हातामध्ये घेऊन नीरा स्नानासाठी नेण्यात येते. नीरास्नान घालण्यात येणार्‍या नीरा नदीच्या पात्रामध्ये वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने दत्त घाटावरील नीरा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी निरास्नान सुलभ होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT