सातारा

सातारा : पोवई नाक्यावरील दरोड्याचा पर्दाफाश; कामगाराने रचला हाेता कट

अविनाश सुतार

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील पोवई नाक्यावर शुक्रवारी (दि.२५) बँकेत १ लाख ५२ हजार रुपये भरायला निघालेल्या कामगाराला रस्त्यात अडवून मारहाण करत दरोडा (Robbery) टाकणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचा शोध सुरु आहे. दरम्यान, दुकानात काम करणार्‍या कामगारानेच हा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

शुभम हनुमंत साठे उर्फ ऋषीकेश, गौरव अशोक भिसे उर्फ ट्यॅटू, राकेश कृष्णा सोनकांबळे (तिघे रा.मल्हार पेठ, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आणखी तीन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी धर्मराज गुंजले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Robbery)

तक्रारदार गुंजले व संशयित राकेश सोनकांबळे हे सातार्‍यातील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करत आहेत. शुक्रवारी गुंजले दुकानातील १ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी पोवई नाक्याकडे जात असताना त्यांना रस्त्यात अडवून चार संशयितांनी मारहाण करत रक्कम चोरली. पैसे चोरुन नेत असताना तक्रारदार यांनी प्रतिकार केला हाेता. भरदिवसा घडलेल्‍या या घटनेने परिसर हादरुन गेला. (Robbery)

सातारा शहर व एलसीबी याचा तपास करत असताना एलसीबीला तपासाला यश आले. तपासामध्ये संशयित राकेश सोनकांबळे याने कट रचून इतर संशयितांना पैसे भरणाची माहिती देवून प्लॅन केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी रोख ५१ हजार ५०० रुपये, २ मोबाईल, दुचाकी असा १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश वाघ, पोलीस उत्तम दबडे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, कांतीलाल नवघणे, शरद बेबले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, अमित सपकाळ, विशाल पवार, मयुर देशमुख यांनी कारवाईत सहभाग घेतला.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT