Phaltan Doctor Death file photo
सातारा

Phaltan Doctor Death: फलटणमधील डॉक्टर तरुणीवर अत्याचार करणारा फौजदार बदने स्वतःहून पोलिसांना शरण

मोहन कारंडे

Phaltan Doctor Death

साखरवाडी : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत संशयित प्रशांत बनकर याला शनिवारी बेड्या ठोकल्या. तर, दुसरा मुख्य संशयित आरोपी फौजदार गोपाळ बदने रात्री उशिरा फलटण पोलिस ठाण्यात स्वतःहून शरण आला. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केली होती.

फलटण शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये डॉक्टर तरूणीने गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेनंतर संपूर्ण फलटणसह राज्यभरात खळबळ उडाली. तिने आपल्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले होते. त्यामध्ये पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचे, तसेच घरमालक प्रशांत बनकर याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते. या प्रकारानंतर फलटणसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रशांत बनकर याला शनिवारी विशेष पथकाने अटक केली. दरम्यान, दुसरा आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे.

गोपाळ बदने काय म्हणाला?

"मी प्रामाणिक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल, त्यावर माझा विश्वास आहे. माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे," असे गोपाळ बदने याने पोलिसांसमोर शरण आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण समाजमन हादरले आहे. एका महिला डॉक्टरला न्याय मिळवण्यासाठी इतक्या टोकाचा मार्ग अवलंबावा लागला, ही बाब अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल आणि निपक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.

दरम्यान, या आत्महत्येच्या प्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी सरकार आणि प्रशासनावर कडक टीका करत पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पोलिस विभाग आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT