विशाल गुजर
सातारा : महावितरण कंपनीने ग्राहकांकडील विजेचे चालू मीटर काढून स्मार्ट मीटर लावणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्राहकांनी या स्मार्ट मीटरला विरोध दर्शवला आहे. वास्तवात या स्मार्ट मीटरची गती ही साध्या मीटरच्या तुलनेत 60 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे प्रात्यक्षिकाद्वारे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना सध्याच्या वीजबिलापेक्षा किमान 60 ते 70 टक्के अधिक रक्कम मोजावी लागेल, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने ग्राहकांमध्ये धास्ती आहे.
प्रशासन वीज गळती, वीजचोरी, अंतर्गत भ्रष्टाचार, भारनियमन या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष्य केंद्रित करण्याऐवजी विजेच्या मीटरवर काम करत आहेत. सन 2015 पासून राज्यात प्री-पेड मीटरची चर्चा सुरु झाली. ग्राहकांनी या मीटरला विरोध दर्शवायला सुरुवात करताच महावितरण कंपनीने राज्यातील विजेच्या एकूण नऊ लाख मीटरची तपासणी केली. यात सात लाख मीटर फॉल्टी आढळून आल्याने राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने माघार घेत फेब्रुवारी 2017 मध्ये प्री-पेड मीटर लावले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. जानेवारी 2025 पासून या प्री-पेड मीटरला पर्याय म्हणून स्मार्ट मीटरची चर्चा सुरु झाली. अलीकडच्या काळात महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी ग्राहकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत स्मार्ट मीटर लावायला सुरुवात केली.
नवीन मीटरची रक्कम ही ग्राहकांच्या माथ्यावर टाकण्यात येत असल्याने याला आतापासूनच विरोध होऊ लागला आहे. महावितरण कंपनीने जिल्ह्यातील ग्राहकांकडील विजेचे चालू मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम सुरू केले आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनी या स्मार्ट मीटरला विरोध करायला सुरुवात केली असली तरी कंपनीचे कर्मचारी चोरून लपून किंवा चुकीची माहिती देऊन हे मीटर लावत आहेत. या स्मार्ट मीटरची गती ही साध्या मीटरच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे वीज बिलात अगोदरच भुर्दंड लागत असताना आता नव्याने नवीन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रत्येक मीटरला तब्बल 12 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
सातारा जिल्ह्यात 8 लाख 70 हजार 875 वीज ग्राहक असून या ग्राहक आहेत. जिल्ह्यात 10 लाख 88 हजार 577 वीज ग्राहक आहेत. त्यातील घरगुती 7 लाख 75 हजार 914, वाणिज्यिक 65 हजार 882, औद्योगिक 11 हजार 270, पाणीपुरवठा 3 हजार 155, पथदिवे 5 हजार 436 तर 9 हजार 207 अशा एकूण 8 लाख 70 हजार 875 ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे. यातून फक्त कृषीच्या 2 लाख 17 हजार 702 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसणार नाहीत.
एक हजार वॅट क्षमतेचा बल्ब एक तास सुरू ठेवल्यास एक युनिट वीज वापरते, ही मीटरची अधिकृत गती महावितरण कंपनीने ठरवून दिली आहे. हा बल्ब अथवा उपकरणे यापेक्षा कमी किंवा अधिक विजेचा वापर करत असल्यास त्या मीटरला फॉल्टी ठरवले जाते.
मध्यंतरी साधे आणि स्मार्ट अशा मीटरच्या गतीचे प्रात्यक्षिक महावितरणच्या अधिकार्यांसमक्ष घेण्यात आले. विजेची सारखी उपकरणे दोन्ही मीटरला वेगवेगळी जोडून ती 10 तास चालवण्यात आली. साध्या मीटरने या 10 तासांतील विजेचा वापर 219 युनिट दाखविला, तर स्मार्ट मीटरने हाच वापर 479 युनिट दाखविला. यावरून स्मार्ट मीटरची गती ही साध्या मीटरपेक्षा किमान 60 टक्के अधिक असल्याचे स्पष्ट झाले.
राज्यात 2 कोटी 85 लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहक असून ते सर्व महावितरण कंपनीला जोडले आहेत. या स्मार्ट मीटरची किंमत 12 हजार रुपये ठरवण्यात आली आहे. महावितरण कंपनी हे 12 हजार रुपये ग्राहकांकडूनच वीज बिलात अतिरिक्त रक्कम जोडून टप्प्याटप्प्याने वसूल करणार आहे. ही रक्कम 342 कोटी रुपयांपेक्षा अधिक असून ती वीज बिलाव्यतिरिक्त आहे.