

भिलार : भोसे, ता. महाबळेश्वर येथे गव्यानी धुमाकूळ घातला आहे. गेले दोन दिवस गावातील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी, गहू, शेतीमध्ये धुडगूस घालून लाखोंचे नुकसान केले आहे. वन विभागाने नुकसानीचे पंचनामे केले आहेत. परंतु, याची नुकसानभरपाई व या रानटी प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हवामानातील बदल व पावसामुळे शेतीवर परिणाम जाणवत असल्याने शेतकरी आतबट्ट्यात आला आहे. त्यातच आता रानटी प्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेली पिके फस्त होत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. भोसे येथील नामदेव गोळे, शिवाजी गोळे, तानाजी गोळे, गणपत पार्टे, संजय कोंडे, संजय गोळे, विजय गोळे, तर घोटेघर येथे अमोल रांजणे, सुनील रांजणे यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी पिकावरही गव्याने रात्रीच्या वेळी हल्ला चढवला आहे. याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. शेती नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.