

सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणांचा गुंता वाढला आहे. खा. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मनोमीलनानंतर एकजूट निर्माण झाल्याचे चित्र दिसत असले तरी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रत्यक्ष रणांगणात फाटाफूट झाल्याचे दिसत आहे.
खा. उदयनराजे गटातील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने ना. शिवेंद्रराजे गटाची अनेक प्रभागांत कोंडी झाली. तर दुसरीकडे उदयनराजे गटातील उमेदवारांविरोधात शिवेंद्रराजे गटाच्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळाल्याने दोन्ही गटात सुप्त सत्तासंघर्ष पेटला.
सातारा पालिका निवडणुकीत दोन्ही राजे गट भाजपअंतर्गत लढत असल्याने पूर्वीच्या आघाड्यांचे अस्तित्व आता राहिले नाही. साताऱ्यात दोन्ही गटांनी 22-22-6 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला वापरला. यामध्ये भाजपच्या मूळ जागा राजे गटांतर्गतच विभागून देण्यात आल्या.
प्रत्यक्ष उमेदवारी निश्चित करताना उदयनराजे गटाचे राजकीय वजन कमी झाल्याची जोरदार चर्चा साताऱ्यातील राजकीय वर्तुळात आहे. उदयनराजे गटाचे प्राबल्य असलेल्या प्रभागात दावेदारांना तिकीट न मिळणे व शिवेंद्रराजे गटातील तुलनेने कमी परिचित किंवा नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले गेल्याने असंतोष उफाळला आहे. उदयनराजे गटात महिला उमेदवारांचा भरणा जास्त आहे. काही प्रभागांत तर उदयनराजे गटातील चर्चेत असलेल्या चेहऱ्यांचे पत्ते ऐनवेळी कापले गेले, अशी चर्चा आहे. परिणामी नाराज इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. या अपक्षांची संख्या लक्षणीय असून त्यांच्यामुळे शिवेंद्रराजे गटाला अनेक ठिकाणी थेट फटका होण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षपद हा या निवडणुकीचा सर्वात संवेदनशील मुद्दा ठरला. दोन्ही गटांनी हे पद मिळावे यासाठी दावा केला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या चर्चेत शिवेंद्रराजे गटाने ठाम भूमिका घेतली. त्यांचा आग्रह आणि राज्यस्तरावर पक्षीय लॉबिंग प्रभावी ठरल्याने शेवटी नगराध्यक्षपद त्यांच्या गटाकडे गेले. यावरून राजकीय दृष्ट्या शिवेंद्रराजे गटाने आपली बाजू भक्कम केली. उदयनराजे गटाने नगराध्यक्षपदासाठी पर्याप्त लाँबिंग केले नाही. त्यांच्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार वेळोवेळी बदलले गेले शिवाय निर्णय प्रक्रियेतील लोक दरदिवसाला वेगळे होते. त्यातून उदयनराजे गटाला बॅकफूटवर रहावे लागले.
उदयनराजे गटातील काहींनीच त्यांच्या गटाचा ऐनवेळी कार्यक्रम केल्याची चर्चा साताऱ्यात सुरु आहे. उदयनराजे गटाचा शिवेंद्रराजेंनी स्वीकारलेला चेहरा मान्य केला असता तर पाच वर्षांचे नगराध्यक्षपद उदयनराजे गटाकडे राहिले असते मात्र होणारा नगराध्यक्ष माझेच ऐकणारा हवा, माझ्याच कोंडाळ्यातला हवा, असा हेका निर्णय प्रक्रियेतील काहींनी ठेवल्याने आणि दस्तुरखुद्द उदयनराजेंना त्यांच्यावर कंट्रोल ठेवता न आल्याने चाणक्यनीतीत शिवेंद्रराजेंची सरशी झाल्याची चर्चा साताऱ्यात आहे. नगराध्यक्षपद न मिळाल्याने उदयनराजे गटाला मोठा धक्का बसला असून आता त्यांना नगरसेवकपदाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
नामनिर्देशपत्र छाननी प्रक्रियेत उदयनराजे गटाच्या काही अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या गटाचे समीकरण आणखी बिघडले आहे. तांत्रिक त्रुटीचे कारण खरे असले तरी त्याआडून राजकीय खेळी खेळली गेल्याची चर्चा रंगली आहे. अर्ज बाद झाल्याने पुढील काळात उदयनराजे गटाला स्वत:ची ताकद वाढवणे कठीण होऊ शकते. स्वत: उदयनराजेंनी कमान हातात घेतली तरच नगरपालिकेत शिवेंद्रराजे गटाच्या बरोबरीने उदयनराजेंचे स्थान राहील.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेवर आणि प्रत्यक्ष लढाईत कोण कुणाविरूद्ध उभा राहतो यावर सातारकरांच्या नजरा खिळल्या आहेत. आगामी दोन दिवसांत राजकीय पातळीवर आणखी धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत उदयनराजे नेमकी कोणती भूमिका घेतात यावरच सातारा नगरपालिकेचे रणांगण कोणत्या दिशेने जाईल हे निश्चित होईल.
कुणी उभारलाय बंडाचा झेंडा?
दोन्ही गटांतून उमेदवारी नाकारल्याने अनेक निष्ठावंतांनी बंडाचा पवित्रा घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग क्र. 2 मध्ये संकेत संजय साठे व रीना भणगे, प्रभाग क्र. 3 मध्ये सनी भोसले, शारदा जाधव, प्रभाग क्र. 4 मध्ये रजनी जेधे व शंकर माळवदे, प्रभाग क्र. 5 मध्ये शिवानी कळसकर, सोनम काळेकर, राम हादगे व सुनेशा शहा, प्रभाग क्र. 6 मध्ये अतुल चव्हाण, बाळासाहेब ढेकणे, सुजाता भोसले, प्रभाग क्र. 7 मध्ये शकील बागवान, प्रभाग क्र. 8 मध्ये विकास देशमुख व रवी माने, प्रभाग क्र. 9 मध्ये संजय पाटील, प्रभाग क्र. 11 मध्ये वसंत लेवे, प्रभाग क्र. 12 मध्ये अश्विनी पुजारी, प्रभाग क्र. 13 मध्ये सावित्री विजय बडेकर, दत्तु धबधबे व सोनिया शिंदे, प्रभाग क्र. 14 मध्ये नासीर शेख, दिनाज शेख व अक्षय गवळी, प्रभाग क्र. 20 मध्ये प्रशांत आहेरराव यांनी बंड केले आहे. काहींनी गटांतर्गत तर कुठे गटाविरोधात बंड केले.