कराड; पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळात रूग्णांना बेड, हॉस्पिटल मिळविताना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आरोग्य सुविधा पुरविताना सरकारच्या मर्यादाही लक्षात आल्या. त्यामुळे भविष्यात आत्मनिर्भर भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणांवर अधिक भर दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
येथील कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये कोरोना वॉरिअर्सच्या सत्कार सोहळ्यात मंत्री नितीन गडकरी बोलत होते.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. प्रशांत परिचारक, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, प्र. कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, डॉ. कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, मकरंद देशपांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नितीन गडकरी म्हणाले, कोरोना काळात सरकारी क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा तोकडी पडली आहे. या काळात रूग्णांना ऑक्सिजनच्या बेडसाठी झगडावे लागले. काहींना तर हॉस्पिटलचे बेडही उपलब्ध झाले नाहीत. तज्ज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी अपुरे पडले. औषधांचा तुटवडा, रिमडेसिव्हीर इंजेक्शनचा तर काळाबाजार झाला. आरोग्य क्षेत्रातील सरकारच्या मर्यादाही यातून समोर आल्या. याचा विचार करून भविष्यात आरोग्य क्षेत्रात भरीव काम करावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.
कृष्णा हॉस्पिटलने कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक करताना गडकरी म्हणाले, कृष्णा हॉस्पिटल नसते तर लोक कुठे गेले असते? त्यांचे काय झाले असते? या कठीण काळात या हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदत केली. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, असेही गडकरी म्हणाले.
जग प्रचंड वेगाने धावत आहे. आपणाला त्या बरोबरीने जावे लागणार आहे. नवनवीन कल्पना, आधुनिकता याचा अंगिकार करावा लागणार आहे.
पेट्रोल, डिझेलची भविष्यातील स्थिती लक्षात घेता इथेनॉल निर्मितीवर साखर कारखान्यांनी भर द्यावा. सांडपाण्यापासून ग्रीन हायट्रोजन, सोलर एनर्जी असे प्रकल्प उभा राहिले पाहिजेत. तरच रोजगार निर्मितीबरोबर समाजाचे अर्थकारण बदलेल.
तसेच कृष्णा साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू करून ठिकठिकाणी पंप सुरू करावेत, यासाठी भारत सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल.
देशातील वाहन कंपन्यातील प्रमुखांची बैठक घेऊन पुढील सहा महिन्यात इथेनॉलवर चालणारी वाहने निर्मिती करण्याच्या सूचना केल्या असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
देशात अद्याप ६०० मेडिकल कॉलेज, २०० सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची आवश्यकता आहे.
तज्ज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी यांची भरती करावी लागेल.
शिक्षण, आरोग्य यावर विशेष भर द्यावा लागेल.
सरकारच्या मर्यादा लक्षात घेता सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या खासगी संस्था, ट्रस्ट यांनी यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
त्यांना सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटलने कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले, कोरोनाचे पहिले उपचार केंद्र कृष्णा रूग्णालयात सुरू केले.
नंतर बेडची संख्या ४०० पर्यंत वाढविली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वाढविले.
ऑक्सिजनची कमतरता रूग्णांना भासू दिली नाही. ३६३ कोरोना बाधित गरोदर मातांवर उपचार केले.
यातील तीन वगळता सर्व सुखरूप गरोदर माता घरी परतल्या.
तसेच आरटीपीसीआरच्या चाचण्या कृष्णामध्ये पहिल्यांदा सुरू झाल्या. यात ४० हजार चाचण्या करण्यात आल्या.
नवजात बालकांपासून शंभरी गाठलेल्या वृध्दांवर कोरोनाचे यशस्वी उपचार करण्यात आल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.
यावेळी कोरोना काळात काम केलेले डॉक्टर्स, कर्मचारी यांच्या पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
डॉ. अतुल भोसले यांनी आभार मानले.
हेही वाचलंत का?