सातारा

कराड: दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; १४ पिस्टलसह १० जणांना अटक

अविनाश सुतार

कराड :पुढारी वृत्तसेवा : दरोडेच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून तब्बल 14 देशी बनावटीच्या पिस्टलसह 22 जिवंत काडतुसे, मिरची पूड, कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजमाची तालुका कराड गावच्या हद्दीत कराड-विटा रोडवर जानाई मंदिराजवळ सोमवारी (दि. 27) रात्री उशिरा ही कारवाई केली.

सनी उर्फ ​​गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी, ता. कराड), अमित हणमंत कदम (रा.अंतवाडी ता. कराड), अखिलेश सूरज नलवाडे (रा. गजानन हाउसिंग सोसाइटी, कराड), धनंजय मारुती वाटकर (रा. सैदापूर ता. कराड) वहीद बाबासो मुल्ला (रा. विंग, कराड), रिजवान रज्जाक नदफ (रा. मलकापूर, कराड), चेतन शाम देवकुले (रा. बुधवार पेठ, कराड), बजरंग सुरेश माने (रा. बुधवार पेठ, कराड), हर्ष अनिल चंदवानी रा. मलकापूर, कराड) व तुषार पांडुरंग शिखरे (रा. हजारमाची, ता. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बेकायदा अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तशाच सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनाही दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची पतके तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोंबिंग ऑपरेशन सुरू असतानाच सोमवारी रात्री पोलीस अरुण देवकर यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत धक्कादायक माहिती समजली.

राजमाची गावच्या हद्दीत कराड-विटा जाणाऱ्या रोडवर जानाई मंदिर जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेताजवळ काही इसम जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे व अरुण देवकर यांनी पोलीस फौज फाटा घेऊन मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथे गेल्यानंतर उसाच्या शेतालगत आडोशाला आठ ते दहा जण उभे असल्याचे पोलिसांना दिसले‌. पोलीस आल्याचे समजताच संशयितांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संशयतांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ नऊ लाख 11 हजार 900 रुपये किमतीच्या 14 देशी बनावटीचे पिस्टल व 22 जिवंत काडतुसे, मिरची पूड, कोयता असा मुद्देमाल आढळून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी संशयतांना ताब्यात घेऊन अटक केली असून कराड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख,अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभागाचे रणजित पाटील, प्रोबेशनरी पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे, पोनि भगवानराव पाटील, पोनि अरुण देवकर, सपोनि रमेश गजे, संतोष पवार, रविंद्र भोरे, फौजदार अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस उत्तम दबडे, तानाजी माने, संतोष पवार, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, प्रविण कांबळे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, संभाजी साळूंखे, पंकज बेसके, येळवे, कुलदिप कोळी, अमित वाघमारे, सज्जन जगताप, सचिन निकम, सागर बर्गे यांनी कारवाईत सहभाग घेतला. वरिष्ठांनी कारवाईत सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

अनेक जण रेकॉर्डवरील संशयित…

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर त्यांच्याकडून 14 पिस्टल व 22 जिवंत काडतुसे तसेच मिरची पूड, कोयता आदी मुद्देमाल जप्त केला. संशयतांची अधिक चौकशी केली असता पोलिसांनी अटक केलेल्या पैकी अनेक जण रेकॉर्डवरील संशयित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. तसेच या टोळीने यापूर्वी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करणार आहेत? त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

पिस्टल आणली कुठून याचा शोध घेणार…

अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांवर यापूर्वी अनेक वेळेला कारवाई झालेली आहे. मात्र त्या कारवाईमध्ये पोलिसांना मुळापर्यंत जाण्यात अपयश आल्याबाबत विचारले असता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले की या कारवाईमध्ये आम्ही संशयितांनी पिस्टल आणली कुठून? त्यांना कोणी दिली? त्याची निर्मिती कोठे केले जाते? पुरवणारे कोण आहेत? याचा संपूर्ण तपास आम्ही करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारवाई हाच अवैध पिस्तूल बाळगणाऱ्यांवर उपाय असू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

गुन्हेगारी डोळ्यांची संशयितांचा संबंध असू शकतो..

पोलिसांचे सोशल मीडियावरती नियंत्रण असते. अनेक वेळेला स्वतःला प्रमोट करण्यासाठी गुन्हेगार सोशल मीडियाचा वापर करत असतात. त्याची माहिती मिळताच पोलीस संबंधितावर कारवाई करत असतात. याशिवाय पोलिसांनी उंच भरारी प्रकल्प सुरू केला आहे. त्या माध्यमातूनही अल्पवयीन मुलांचे प्रबोधन करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. असे संगत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कराड मधील गुन्हेगारी तुळशी यातील अनेकांचा संबंध असू शकतो त्याचाही आम्ही तपास करणार आहे, असे सांगितले.

अवैध स्वरूपात एखादा व्यक्ती पिस्टल बाळगत असेल तर नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. तसेच एखाद्या व्यक्तीकडे कोणी पिस्टल आणून दिले किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्याला विनापरवाना पिस्टल देत असल्याची माहिती मिळाली तर नागरिकांनी पोलिसांची संपर्क साधावा. समाजात दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

– समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT