सातारा : गोळीबार करत दोघा भावांचा पाठलाग | पुढारी

सातारा : गोळीबार करत दोघा भावांचा पाठलाग

कराड : पुढारी वृत्तसेवा : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघा भावांचा पाठलाग करत त्यांना कोयता, तलवारीचा धाक दाखवला. तसेच त्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चचेगाव, ता. कराड हद्दीत 12 मार्च रोजी ही घटना घडली होती. याबाबत शुक्रवारी कराड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. त्यानुसार सोळाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक वगरे, रोहन वगरे, विकास घारे, ओमकार वगरे, कुमार वगरे, महेश माने, शिवाजी माने, आबा घारे (सर्वजण रा. घारेवाडी, ता. कराड) यांच्यासह अनोळखी सात ते आठजणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
याबाबत श्रीधर राजेंद्र घारे (रा. घारेवाडी) या युवकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारेवाडी येथील श्रीधर घारे याच्या कुटुंबियांचा जमिनीच्या कारणावरून अशोक वगरे याच्याशी वाद झाला होता. त्यामध्ये श्रीधरची आई जखमी झाली होती. तिच्यावर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. 12 मार्च रोजी जखमी आईला पाहण्यासाठी श्रीधर घारे व त्याचा भाऊ रितेश घारे हे दोघेजण दुचाकीवरून घारेवाडीहून कराडला येत होते. ते दोघे चचेगाव गावच्या हद्दीत आलेले असताना एक जीप व दुचाकीवरून काहीजण आडवे आले. त्यांच्या हातात लाकडी दांडके, कोयता आणि तलवार होती. ते मारहाण करण्याच्या उद्देशाने आल्याचे निदर्शनास आल्यामुळे श्रीधर व त्याचा भाऊ रितेश हे दुचाकी त्याचठिकाणी सोडून नजीकच्या उसाच्या शेतात पळाले. त्यावेळी संशयित आरोपींनी त्यांच्या गाड्या त्याचठिकाणी सोडून दोघांचा पाठलाग सुरू केला. श्रीधर व रितेश हे उसातून पळून जाऊन एका ओढ्याकडेला गेले. त्यावेळी पिस्तुलातून तीनवेळा गोळीबार केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या श्रीधर व रितेश यांनी गावाच्या दिशेने पळ काढला. तसेच गावातील एका घरात त्यांनी आसरा घेतला. संबंधित कुटुंबियांनी त्या दोघांना धीर देत आपल्या घरात लपवून ठेवले. काहीवेळाने त्यांचा पाठलाग करणारे संशयित आरोपी तेथून निघून गेले. या घटनेबाबत श्रीधर घारे याने शुक्रवारी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोळाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button