परळी पाटेघर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.  Pudhari Photo
सातारा

परळीत अतिवृष्टी; पूल पाण्याखाली, झाडे पडली

पुढारी वृत्तसेवा

परळी : पुढारी वृत्तसेवा

सातारा तालुक्यातील परळी खोर्‍यात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे खोर्‍यातील अनेक गावांमधील पूल पाण्याखाली गेले आहेत. तर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. लावंघर येथील बंधारा फुटल्याने शेतीचे नुकसान झाले. बुधवारी झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दुपारनंतर शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या. परळी खोर्‍यातील परळी, ठोसेघर, चाळकेवाडी, केळवली, पाटेघर, सांडवली यासह बहुतांश गावांमध्ये पावसाची कोसळधार सुरूच आहे. यामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या व पडझडीच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परळी ते पाटेघर रस्त्यालगत असणार्‍या जुगाई देवी येथील ओढ्याला पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. लावंघर येथील मस्करवाडी व करंजे ही गावे जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

याच पुलावरून वाहत असलेले पाणी शेतात घुसल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे. लावंघर येथे अतिवृष्टीमुळे शेती बंधारा वाहून गेला तर दुसर्‍या एका बंधार्‍याला भालेमोठे भगदाड पडले आहे. आरेदरे, सोनवडी, गजवडी या गावांना जोडणार्‍या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झघली आहे. तर आरे दरे, शेळकेवाडी व सोनवडी मार्गावरील वाहतूक मुसळधार पावसामुळे बंद झाली आहे. पाणी जास्त असल्याने गजवडी व सोनवडीतील शेतकर्‍यांना पूलाच्या पलिकडे जाणे अशक्य झाले आहे. ठोसेघर गावातील शाळेजवळ झाड उन्मळून पडल्यामुळे विजेचे खांब वाकले आहे. विजेच्या तारा लोंबकळत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेत व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. सज्जनगड किल्ल्यावरही दोन-तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर मातीचा भराव वाहून आल्याने वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

अनेक गावांमधून रस्त्याचे ओढ्या-नाल्यांचे पाणी शेतात घुसल्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच डोंगरदर्‍यातील मातीच्या घरामधून पाणी येत असल्यामुळे घरात उपळे फुटू लागले आहेत. याचबरोबर ठोसेघर पठारावरील चिखली, जगमीन, पांगारे, पळसावडे या गावांमधील छोटी-छोटी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. उरमोडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सायकांळी 5 वाजेपर्यंत धरणात पाच टीएमसी पाणीसाठा झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT