नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोयना, राधानगरी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर बुधवारी (दि.24) सायंकाळी साडेपाच वाजता पाण्याखाली गेले आहे. संततधार पाऊस आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे दिवसभरात कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत दोन फूट वाढ झाली आहे. येथे कृष्णा पंचगंगा संगम असल्यामुळे हे महापुराचे तालुक्यातील मुख्य केंद्र बनले आहे. पंचगंगा नदीला शिवा, भद्रा, कुंभीकासारी, सरस्वती, भोगावती या नद्या मिळाल्या आहेत. पाणी पातळीत सातत्याने वाढ होत राहते त्यामुळे कृष्णा पंचगंगा नदी काठच्या नागरिकांना सातत्याने धोक्याला सामोरे जावे लागते.
दरम्यान येथील बाबर प्लॉट नागरी वसाहतीत पुराचे पाणी शिरले असून नागरिक स्थलांतराच्या हालचाली करीत आहेत. सकाळी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. यामुळे पूरग्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र दुपारी तीन नंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा एकदा महापुराच्या भीती निर्माण झाली आहे. अलमट्टी धरणातून अपेक्षेपेक्षा कमी विसर्ग होत असल्यामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची मोठी फुग निर्माण होते असे पूरग्रस्तांचे मत आहे.