सातारा : शासकीय सेवेत असूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सरकारी पाहुणचार घेणार्या त्या लाडक्या बहिणी आरोग्य विभागातील असल्याचे समोर आले आहे. विभागाकडून याची शहानिशा करण्यात येत आहे. लवकरच या लाडक्या बहिणींना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर नेमकी काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.
राज्यभरात जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या 1 हजार 183 महिला कर्मचार्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. या महिलांचा शोध महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील अश्विनी कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्र कुसूंबी (ता. जावली) येथे आरोग्य सेविका, संध्या कांबळे व तनुजा बाळू झिमल या दोघी प्राथमिक आरोग्य केंद्र पुळकोटी (ता. माण) येथे आरोग्य सेविका, सुप्रिया गुरव प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे आरोग्य सेविका, प्रियांका गार्डी तळमावले ता. पाटण येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. तर अंकिता लाडी, शुभांगी रासकर, प्रतिभा विधाते या पूर्वी आरोग्य सेविका म्हणून जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. मात्र, आता त्या आरोग्य विभागात नोकरीस नाहीत तरीही त्यांची शहनिशा आरोग्य विभागमाार्फत करण्यात येत असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.
सर्वच आरोग्य सेविकांच्या पडताळणीचे काम आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर घेण्यात आले आहे. यामध्ये काही आरोग्य सेविका 11 महिन्यांच्या करारावर काम करत असून त्या बंधपत्रित आहेत. मात्र, त्यापैकी काही आरोग्य सेविका कायमस्वरूपी असतील तर त्यांना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या शासकीय सेवेत असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे हे चुकीचे आहे. आठ महिलांची नावे निष्पन्न झाली असून त्याची पडताळणी आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी