

सातारा : सातारा शहराच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातून कराडकडे जाणार्या रस्त्यावर शिवराज चौकामध्ये रस्त्याची दाणादाण उडाली आहे. या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहने आदळत असून, अपघाताही होत आहेत.
कोल्हापूर, कराडकडून येणारी वाहने शिवराज चौकातून शहरात येतात. विशेषत: एसटी महामंडळाच्या बसेस याच मार्गावरुन मध्यवर्ती बसस्थानकाकडे ये-जा करत असतात. बसेस तसेच इतर वाहने या खड्ड्यांमध्ये आदळत आहेत. दरम्यान, शहरात येण्यासाठी येथील बसथांब्यावर नेहमीच प्रवासी थांबलेले असतात. समोरच्या रस्त्यावरील खड्ड्यातून एखादे वाहन जाताच चिखलाचे पाणी वाहनाची वाट पाहणार्या प्रवाशांच्या अंगावर उडते. शाळा, महाविद्यालयाकडे जाण्यासाठी थांबलेले विद्यार्थी, नोकरदार यांना यामुळे मन:स्ताप सोसावा लागत आहे.
सातारा नगरपालिकेच्यावतीने शहराकडे येणारी सर्वच प्रवेशद्वारे सजवलेली आहेत. मात्र, प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्याची झालेली चाळणही दूर करावी. पाऊस थांबला असल्याने या रस्त्याची डागडुजी करून घ्यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.