मुनावळे येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे स्वागत करताना ना. शिवेंद्रराजे भोसले पहिल्या छायाचित्रात दिसत असून दुसर्‍या छायाचित्रात जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्यपालांचे स्वागत करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील. शेजारी एसपी तुषार दोशी व इतर. (Pudhari File Photo)
सातारा

Governor Visit Munawale | राज्यपालांचे मुनावळेत जलपर्यटन

ना. शिवेंद्रराजे यांच्यासमवेतही चर्चा : शेतकर्‍यांनी जैविक शेतीकडे वळावे

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर / बामणोली : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे दोन दिवस सातारा जिल्हा दौर्‍यावर असून त्यांनी जावली तालुक्यातील मुनावळे या ठिकाणी सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या जलपर्यटनाला भेट देत सहकुटुंब जल पर्यटनाचा आनंद लुटला. दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही त्यांची भेट घेवून चर्चा केली. दरम्यान, महाबळेश्वर येथे बोलताना राज्यपालांनी शेतकर्‍यांना जैविक शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला.

मुनावळे येथे बोलताना राज्यपाल म्हणाले, कोयना जल पर्यटन बघण्याचे मला भाग्य मिळाले. या ठिकाणी असणारे स्वच्छ पाणी व सुंदर परिसर पाहून मला आनंद झाला. त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार पर्यटन केंद्राला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. मला असे वाटते की येणार्‍या काळात हे पर्यटन केंद्र लोकांना आनंद देणारे खूप मोठे ठिकाण होईल. महाराष्ट्र सरकार यासाठी आणि या भागातील स्थानिक लोकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

यावेळी ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील त्यांची आवर्जून भेट घेतली. त्यांनी साताराचे कंदी पेढे देऊन राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले व राज्यपाल यांच्यामध्ये बराच वेळ पर्यटनावर चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकार्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे शनिवारी राजभवन महाबळेश्वर येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के यांनीही राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलिस विभागाच्या वतीने राज्यपाल महोदयांना मानवंदना देण्यात आली. राज्यपालांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमवेत चर्चा केली. महाबळेश्वरला देश- परदेशातील पर्यटक येतात, त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची सूचना त्यांनी केली. तसेच महाबळेश्वर परिसरातील शेतकर्‍यांनी अधिकाधिक जैविक शेतीकडे वळावे यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही राज्यपाल म्हणाले. यावेळी राज्यपालाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.

मुनावळे येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे स्वागत करताना ना. शिवेंद्रराजे भोसले पहिल्या छायाचित्रात दिसत असून दुसर्‍या छायाचित्रात जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्यपालांचे स्वागत करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील. शेजारी एसपी तुषार दोशी व इतर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT