

सातारा : आपल्या घरी नवा पाहुणा यावा, घरात किलबिलाट व्हावा, अशी नवीन दाम्पत्यांची इच्छा असते. आजी आजोबांना वर्षात बाळाचा पाळणा हलावा अशी इच्छा असते. अनेक महिला केवळ एकच मुलगा किंवा मुलीला जन्म देतात. मात्र, काही वेळा जुळे किंवा तिळे जन्मास येतात.
सध्या सर्वत्र जुळी मुले जन्माला येण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा हे खूपच वाढले आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरात 47 जुळ्यांनी जन्म घेतला आहे. जेव्हा जुळी मुले जन्माला येतात, तेव्हा नातेवाईकांचा आनंद व्दिगुणित झालेला असतो. जुळी झाली, आता पेढे द्या, असे रुग्णालयात ऐकायलाही मिळते. मुलांच्या जन्मासाठी आयव्हीएफ, आयसीएसआय, कृत्रिम गर्भाधारण आदी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या तंत्रज्ञानामुळे एकापेक्षा जास्त मुलांच्या जन्माची शक्यता वाढते. उशिरा मूल होऊ देण्याचा निर्णय, गर्भनिरोधकांचा वाढता वापर आणि कमी प्रजनन क्षमता याचाही जुळी मुले जन्माला येण्यामध्ये मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जुळ्या मुलांच्या प्रसूतीदरम्यान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. तसेच गरोदरपणात, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतरही आई आणि मुलांसाठी गुंतागुंत निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असते. बहुविध गर्भधारणा सहसा एकापेक्षा जास्त अंडी फलित झाल्यावर होते. जेव्हा एक अंडी फलित होते आणि नंतर दोन किंवा अधिक भ्रूणांमध्ये विभाजित होते, ज्यामुळे दोन किंवा अधिक बाळ होतात.