

सातारा : डॉ. संपदा मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल आला असून गळफासामुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अद्याप व्हिसेराचा अहवाल प्रलंबित असून त्याला साधारण 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णायातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचा गेल्या आठवड्यात फलटण येथील हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तसेच त्यांच्या हातावर फौजदार गोपाल बदने याने अत्याचार केला तर प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिला असल्याबाबतचा मजकूर आढळला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. डॉ. संपदा यांची आत्महत्या की हत्या? असा सवालही उपस्थित झाला होता. कुटुंबीयासह, सामाजिक संस्था, विविध पक्षांकडून डॉक्टर युवतीच्या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती.
डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू फलटण येथे झाल्यानंतर मध्यरात्री त्यांचे कुटुंबीय फलटणमध्ये पोहोचले. मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला. ज्यांच्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला. यातून फलटणमध्ये तणाव निर्माण झाला. अखेर डॉ. संपदा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे त्यांचा मृतदेह सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला होता.
डॉ. संपदा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आले. शवविच्छेदन अहवालामध्ये डॉ.संपदा मुंडे यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांच्या शरीरावर इतर कोणतीही जखम नाही. शवविच्छेदन झाल्यानंतर व्हिसेरा देखील राखून ठेवण्यात आला. याचा अहवाल येण्यास अजून 15 दिवस जातील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली.