विठ्ठल हेंद्रे
सातारा : आजही 21 व्या शतकात आपण समाज म्हणून गुणवत्तेला मान द्यायला शिकलो नाही. सत्ताशरण समाज ही आपली ओळख बनत चालली आहे. आपण बुद्धिवंतांचा आदर करत नाही. सत्ता हेच आपल्याला सौंदर्य वाटू लागले आहे. हे महाराष्ट्रासाठी जास्त धोकादायक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी झालेल्या विशेष मुलाखतीमध्ये केले.
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजित विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. ‘पुढारी’ न्यूज चॅनलचे संपादक प्रसन्न जोशी आणि ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
गिरीश कुबेर म्हणाले, आज प्रसार माध्यमांना उत्तरदायित्व उरलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. काही वृत्तपत्रांचे मालक हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते विशिष्ट बाजू घेऊन पत्रकारिता करतात. परंतु, त्यामुळे समग्र माध्यमांवर अप्रामाणिकपणाचा आरोप केला जातो. त्यातून पत्रकारिता सरसकट बदनाम होत राहते. वास्तुत: शरणता न दाखवणे हे माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. माध्यमांनी आपले काम चोखपणाने करणे अपेक्षित आहे.
आजच्या साहित्य विश्वावर भाष्य करताना ते म्हणाले, आजही मोठा वाचकवर्ग पुलंच्या पुढे गेलेला नाही. माध्यमांनी निवडक वर्गाला प्राधान्य दिले आहे. भूमिका न घेणे हे सडू लागलेल्या समाजाचे लक्षण आहे. या विशेष मुलाखतीमध्ये संवादकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून मुलाखत गाजवली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.