महाबळेश्वर : प्रेषित गांधी
महाबळेश्वराच्या थंडीत पालिका निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अर्ज माघारीनंतर नगराध्यक्षपद व प्रभागांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी तर प्रभागांमध्ये दुरंगी,तिरंगी चौरंगी व काही प्रभागातील पंचरंगी लढती होणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातच प्रमुख सामना होणार आहे. मात्र, भाजप, लोकमित्र जनसेवा आघाडीने उमेदवार देत दोन्ही पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे महाबळेश्वरात कांटे की टक्कर होणार आहे.
महाबळेश्वर पालिकेचे रणांगण रंगतदार अवस्थेत आले आहे. आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने शांतपणे पावले टाकत सबुरीने घेत बहुतांशी प्रभागात हेवीवेट उमेदवार दिले आहेत. बंडखोर नासीर मुलाणी यांची माघार राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. लोकमित्रचे डी. एम. बावळेकर व ठाकरे गटाचे राजेश कुंभारदरे यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे.
कुमार शिंदे हे स्वत: नगराध्यक्षपदासाठी उभे असून त्यांची यंग ब्रिगेड काय करणार याकडे लक्ष आहे. पालिकेच्या प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीचे युसूफ शेख विरूध्द गिरीस्थान आघाडीचे राजू नालबंद व लोकमित्र जनसेवा आघाडीचे शंकर ढेबे यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. महिलांमध्ये राष्ट्रवादीच्या विद्या बावळेकर, गिरीस्थान आघाडीच्या प्रियांका बावळेकर व अपक्ष अझीनत चौगुले नावेज बडाणे अशी चौरंगी झुंज रंगणार आहे.
येथे चारही उमेदवार नवखे असून कोण बाजी मारते याकडे लक्ष आहे. प्रभाग 2 मधून गिरीस्थान आघाडीचे प्रशांत आखाडे विरुद्ध राष्ट्रवादीचे संतोष आखाडे आणि लोकमित्र जनसेवा आघाडीचे क किरण काळे व अपक्ष आसिफ शेख अशी चौरंगी लढत होत आहे. यामध्ये दोन्ही आखाडेंमध्येच अटीतटीचा सामना रंगणार आहे. महिलांमध्ये राष्ट्रवादीच्या संगीता वाडकर विरूध्द गिरीस्थान आघाडीच्या सोनाली बांदल असा दुरंगी सामना होणार आहे.
प्रभाग 3 मध्ये राष्ट्रवादीच्या विमल पार्टे विरूध्द गिरीस्थान आघाडीच्या पूजा उत्तेकर यांच्यातच लढत होत आहे. येथे आत्या व भाची यांच्यातच होणार्या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. पुरूषांमध्ये भाजपचे रवींद्र कुंभारदरे, राष्ट्रवादीचे विशाल तोष्णीवाल आणि गिरीस्थान आघाडीचे हेमंत साळवी अशी तिरंगी लढत होत आहे.
प्रभाग 4 मध्ये गिरीस्थान आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले कुमार शिंदे हे स्वत: निवडणुक लढवत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय कदम, लोकमित्र जनसेवा आघाडीचे बाळकृष्ण साळुंखे हे रिंगणात आहे. तर कुमार शिंदे यांचे बंधुन किरण शिंदे हेही अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. महिलांमध्ये राष्ट्रवादीच्या वंदना ढेबे, गिरीस्थान आघाडीच्या विमल बिरामणे व शर्मिला वाशिवले यांच्यातच वॉर होत आहे. यामध्ये कुमार शिंदे कुणाला पाठिंबा देतात यावर लक्ष आहे.
प्रभाग 5 मधून राष्ट्रवादीच्या अपर्णा सलगरे विरूध्द गिरीस्थान आघाडीच्या प्रभा नायडू, अपक्ष स्मिता पाटील व सना शेख यांच्यात चौरंगी लढा होत आहे. पुरूषांमध्ये राष्ट्रवादीचे अॅड. संजय जंगम विरूध्द अपक्ष राजेश कुंभारदरे व प्रतीक जंगम असा तिरंगी सामना होत आहे. यामध्ये संजय जंगम व राजेश कुंभारदरे यांच्यातच चुरस लागणार आहे.
प्रभाग 6 मधून राष्ट्रवादीच्या उषा कोंडे विरूध्द गिरीस्थान आघाडीच्या निता झाडे यांच्यातच दुरंगी लढत लागली आहे. पुरूषांमध्ये राष्ट्रवादीचे संतोष शिंदे विरूध्द गिरीस्थान आघाडीचेराहुल भोसले, अपक्ष दुर्वेश प्रभाळे, मनोहर जाधव अशी चौरंगी लढत होत आहे.
प्रभाग 7 मधून राष्ट्रवादीच्या तरन्नुम वलगे विरूध्द गिरीस्थान आघाडीच्या शबाना मानकर यांच्यातच अटीतटीचा सामना होणार आहे. पुरूषांमध्ये नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतलेले राष्ट्रवादीचे नासीर मुलाणी व गिरीस्थान आघाडीचे सलीम बागवान यांच्यातच टस्सल होत आहे.
प्रभाग 9 मध्ये गिरीस्थान आघाडीच्या संगीता हिरवे विरूध्द राष्ट्रवादीच्या रेश्मा ढेमे व अपक्ष संगीता हिरवे व मेघा ढेबे यांच्यातच चौरंगी लढत होणार आहे. पुरूषांमध्ये राष्ट्रवादीकडून माजी उपनगराध्यक्ष अफझल सुतार विरुद्ध गिरीस्थान आघाडीचे मोअज्जम नालबंद यांचे थेट आव्हान असणार आहे. तर लोकमित्र जनसेवा आघाडीकडून आशिष चोरगे हेही मैदानात असून तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे.
प्रभाग8 मध्ये कुमार शिंदे यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या प्रियंका वायदंडे यांच्यातच लढत होत आहे. या प्रभागात स्वप्नाली शिंदे यांच्या सख्ख्या जाऊबाई शुभांगी शिंदे यांनीही शड्डू ठोकल्याने लढत तिरंगी होत आहे. तर ब विभागात राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक संजय पिसाळ यांचे बंधू राहुल पिसाळ हे रिंगणात असून त्यांच्या विरूध्द गिरीस्थान आघाडीच्या माजी नगरसेविका संगीता गोंदकर यांच्यात सामना होणार आहे.
प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीच्या पल्लवी कोंढाळकर यांच्याविरुद्ध गिरीस्थान आघाडीकडून माजी नगरसेविका सुनीता आखाडे आणि भाजपच्या अश्विनी ढेबे व लोकमित्र जनसेवा आघाडीच्या सुनीता ढेबे व अपक्ष सीमा तोडकर या मैदानात असून येथे पंचरंगी सामना रंगणार आहे. पुरूषांमध्ये राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे यांचे पुत्र रोहित ढेबे यांना मैदानात उतरवण्यात आले असून यांच्याविरुद्ध अपक्ष विनोद गोळे व भाजपचे मनीष मोहिते यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
पक्षांबरोबर आघाड्याही मैदानात
महाबळेश्वरच्या राजकारणात राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातूनच निवडणूक लढवल्या जातात हा इतिहास होता. यंदा मात्र याला फाटा देत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष चिन्हावर निवडणूक लढवली. भाजपनेदेखील राष्ट्रवादीचीच री ओढत तीन जागांवर उमेदवार दिले. दुसरीकडे उध्दव ठाकरे गट व शरद पवार गटाच्या सहकार्याने लोकमित्र जनसेवा आघाडीनेही नगराध्यक्षपदासह 5 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तर शिवसेना पुरस्कृत गिरिस्थान नगरविकास आघाडीने पूर्ण पॅनल उभा केले असून याची धुरा कुमार शिंदे यांच्यावर सोपवली आहे. पालिकेसाठी 20 प्रभागातून 61जण आपले नशीब आजमवणार आहे.