योगेश चौगुले
सातारा : शाहूनगरीत सुरू असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक विलक्षण, पण अंतर्मुख करणारे चित्र समोर आले आहे. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलिस कर्तव्य बजावत असतानाच, संधी मिळेल तसा क्षण पुस्तकांच्या पानांत हरवताना दिसत आहेत. कर्तव्याच्या पहाऱ्यात साहित्यिक विचारांची पाखरं बंदोबस्ताच्या पलीकडे पुस्तकांत गुंतलेली खाकी पाहावयास मिळत आहे. बाहेरून पाहता हा एखादा साधा प्रसंग वाटू शकतो; पण त्याच्या आत दडलेला अर्थ मात्र फार खोल आणि समाजमनाला विचार करायला लावणारा आहे.
पोलिस म्हणजे अधिकार, शिस्त, कडकपणा आणि अनेकदा भीती अशीच पारंपरिक प्रतिमा आपल्या समाजमनात रुजलेली आहे. मात्र, साहित्य संमेलनाच्या परिसरात उभ्या असलेल्या महिला पोलिस जेव्हा एखाद्या कवितेची ओळ वाचताना, पुस्तकाची पानं उलटताना दिसतात, तेव्हा ही प्रतिमा हळूच विरघळू लागते. खाकी हा संवेदना जपणारे आणि ज्ञानाची ओढ असलेले माणूसपण आहे, हे त्या क्षणांतून ठळकपणे समोर येते.
संमेलन हे समाजाच्या सामूहिक जाणिवांचे उत्सवस्थान आहे. अशा ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला पोलिस साहित्याकडे आकृष्ट होतात, याचा अर्थ साहित्याचे हे बळ अजूनही जिवंत आहे. या दृश्याचा स्त्रीदृष्टीने विचार केला, तर तो अधिक अर्थपूर्ण ठरतो. घर, समाज आणि नोकरी अशा तिहेरी जबाबदाऱ्या पेलणाऱ्या महिला पोलिस एका बाजूला कायदा-सुव्यवस्थेची धुरा सांभाळतात, तर दुसऱ्या बाजूला वैचारिक समृद्धीचा शोध घेतात. हे चित्र स्त्री सक्षमीकरणाची घोषणा न करता, ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देते. शिक्षण, वाचन आणि विचार करण्याचा अधिकार हा कुठल्याही भूमिकेपुरता मर्यादित नसतो, हे त्या शांतपणे अधोरेखित करतात.
पोलिसांची सततची सतर्कता, दबाव आणि सामाजिक संघर्षांचा सामना करताना मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. अशा वेळी साहित्य हे केवळ छंद राहत नाही, तर मानसिक विश्रांतीचे, आत्मपरीक्षणाचे आणि संतुलन राखण्याचे साधन ठरते. पुस्तक माणसाला थांबवते, विचार करायला लावते आणि प्रसंगी अधिक समंजस निर्णय घ्यायला शिकवते. त्यामुळे खाकीतले हात जेव्हा पुस्तक धरतात, तेव्हा त्या हातांत केवळ कागद नसतो, तर माणुसकीची धार असते.
या प्रसंगातून पोलिस व्यवस्थेबद्दल समाजानेही नव्याने विचार करण्याची गरज आहे. पोलिस म्हणजे ‘आपण’ आणि ‘ते’ असा भेद न करता, तेही आपल्यासारखेच वाचणारे, विचार करणारे, भावनिक असलेले नागरिक आहेत, हे स्वीकारायला हवे. साहित्य आणि संस्कृती जेव्हा सुरक्षा यंत्रणेशी हातमिळवणी करतात, तेव्हा समाज अधिक सुसंवादी बनतो.
‘खाकी’ जेव्हा पुस्तकात दंग होते...
बंदोबस्त आणि बौद्धिकता, शिस्त आणि संवेदना, खाकी आणि कविता हे परस्परविरोधी नाहीत. उलट, या सगळ्यांचा संगम झाला, तर समाज अधिक सुरक्षित, समजूतदार आणि सुसंस्कृत होऊ शकतो. खाकी जेव्हा पुस्तकात दंग होते, तेव्हा केवळ पोलिसच नव्हे, तर संपूर्ण समाज एका उजळ दिशेने वाटचाल करत असतो.