कोरेगाव (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
भोसे (ता. कोरेगाव) येथे ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त छबिन्यामध्ये सासनकाठी नाचविताना विद्युत तारेचा शॉक लागून मानकरी महेश बाळासो माने (वय 28) या युवकाचा मृत्यू झाला.
भोसे येथील ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने सोमवारी रात्री मानाचा छबिना व सासनकाठी यांची ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाली. मंगळवारी सकाळी ग्रामदेवतेची पालखी व मानाच्या सासनकाठीची ग्राम प्रदक्षिणा सुरू झाली. यामध्ये मानकरी महेश माने यांच्यासह भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, सासनकाठीचा धक्का विद्युत वाहक तारेला लागला. यामध्ये या तारेला महेश माने यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. क्षणार्धात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली.
यानंतर सरपंच अजित माने यांच्यासह युवकांनी महेशला कोरेगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भोसे येथे प्रगतशील शेतकरी व सासन काठीचे मानकरी असलेल्या महेश माने यांचा दोन वर्षापूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर आता त्यांचा मुलगा गेल्याने माने कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.