दहिवडी : डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून दूर जात असल्याचे वास्तव लक्षात घेऊन आंधळी ग्रामपंचायतीने शैक्षणिक शिस्तीसाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायतीने सर्वानुमते दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत ‘अभ्यासाचे दोन तास’ हा अभिनव उपक्रम राबवण्याचा ठराव मंजूर केला असून, या कालावधीत संपूर्ण गावात मोबाईल फोन व दूरदर्शन संच बंद ठेवले जाणार आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शांत, निर्भेळ व अभ्यासास पूरक वातावरण मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मोबाईलवरील गेम्स, सोशल मीडियाचा अतिरेक तसेच टीव्हीवरील कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग पावत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना, सामूहिक शिस्तीच्या माध्यमातून आंधळी गावाने आदर्श निर्माण केला आहे. ‘अभ्यासाचे दोन तास’ या उपक्रमाची सुरुवात व समाप्ती ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवून जाहीर केली जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता पहिला सायरन वाजल्यानंतर गावातील प्रत्येक घरात मोबाईल व टीव्ही बंद ठेवले जातील, तर रात्री 9 वाजता दुसरा सायरन वाजल्यानंतर अभ्यासाचा वेळ संपल्याचा संकेत दिला जाईल. त्यामुळे वेळेचे भान राखून उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.
या निर्णयासाठी आयोजित ग्रामसभेला ज्येष्ठ नेते अर्जुन काळे, आदर्श सरपंच दादासाहेब काळे, उपसरपंच जयश्री चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सविता खरात, सुधाकर काळे, शिवाजी काळे, अभिजित भोसले, जयप्रकाश वलेकर, तानाजी काळे, आप्पा गोरे, संजय काळे, बापूराव काळे, भगवान चव्हाण, रोहिदास काळे, संपर्क अधिकारी जी. एल. दडस, ग्रामपंचायत अधिकारी विकास गायकवाड, ज्येष्ठ नागरिक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलांचे लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होईल...
आजच्या काळात मोबाईल आणि टीव्ही हे शिक्षणातील मोठे अडथळे ठरत आहेत. ‘अभ्यासाचे दोन तास’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेळेची शिस्त लागेल, पालकांचा सहभाग वाढेल आणि मुलांचे लक्ष अधिकाधिक अभ्यासाकडे केंद्रित होईल, असा विश्वास आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांनी व्यक्त केला.