

वेळे : ओझर्डे, ता. वाई येथे धोम डावा कालव्याला पाणी सोडण्यात आल्यानंतर ओझर्डे गावच्या हद्दीतील मायनर क्रमांक 19 येथून पाणी थेट शेतकऱ्यांच्या रहदारीच्या रस्त्यावर वाहू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या नासाडीबद्दल शेतकरी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देवूनही यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी रस्त्यावर सोडण्यासाठी का? असा सवाल केला जात आहे. यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
कालव्याचा वाढलेला फ्लो नियंत्रित न केल्याने रस्त्यावर 300 ते 400 फूट परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या उसतोड हंगाम सुरू असून ऊस वाहतूकीला अडथळा येत आहे. वाहतूक करता येत नसल्याने तोडणीच ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे पाणी रस्त्यावर येण्यासाठी थांबवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. ओझर्डे येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा पाटकाऱ्यांकडे तक्रारी करूनही ‘आज करतो-उद्या करतो’ अशा उडवाउडवीच्या उत्तरांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
मायनर 19 वर कॅनलमध्ये घाण साचून वाहिन्यांचा बराच भाग बंद झाल्याने पाणी शेतीत पोहोचत नाही; उलट रस्त्यावर पाणी येते. तसेच पाणी सोडताना कोणतेही नियोजन नसल्याने कालवा कुठे आणि रस्ता कुठे हेच कळेनासे झाले आहे. दररोज लाखो लिटर पाणी रस्त्यावर जात आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईमुळे बोअरवेल सुरू करून पीक वाचवावे लागत आहे, असा विरोधाभास पहायला मिळत आहे. यामुळे पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे नियोजन पूर्णपणे फसल्याचे चित्र दिसत आहे.