

सातारा : रहदारीचा चौक... रस्त्याकडेची जागा अन् संगीताचा गाजावाजा... ये-जा करणार्यांचे लक्ष वेधत आहे. दोन्ही बाजूला दोन बांबूंच्या आधारे टांगलेल्या दोरीवर चिमुकली तोल सांभाळण्याचे कौशल्य दाखवत असल्याचे द़ृश्य शहर परिसरात पहायला मिळत आहे. त्यांच्या या कसरतीने अवाक झालेले नागरिक कधी कळवळून तर कधी दयेच्या भावनेतून बक्षीस रूपात काही पैसे देतात. फिरस्त्या कुटुंबाची गुजरान व पोटाची भूक भागवण्यासाठी दोरीवरच्या या कसरती व बक्षिसी आधार ठरत आहे.
पूर्वी मनोरंजनाची साधने कमी होती. तर गरीब, गरजूंसाठी पोटापाण्यासाठी रोजगाराच्या संधी कमी होत्या. तेव्हा ठराविक समाज माकडाचे खेळ करून त्यातून मिळालेल्या शाबासकी, धान्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. काही फिरस्ता समूह दोरीवरच्या कसरती सादर करत असत. परंतु आता शासनाच्या वतीने गरीबी हटवण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. तसेच कायद्यानेही अशा जीवाशी खेळ होणार्या प्राणी व माणसांच्या कसरतींवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे ती द़ृश्य कमी झाली आहेत. मात्र मागील आठवडाभरापासून सातारा शहर व परिसरात ठिकठिकाणी वर्दळ व रहदारीच्या चौकात, रस्त्याकडेला एक चिमुकली तिच्या पालकांसमवेत दोरीवर चालण्याची कसरत करताना दिसत आहे. परप्रांतीय कुटुंबातील चिमुकली अंगी असलेल्या कौशल्याच्या जोरावर दोरीवर कसरत करताना दिसत आहे. दोन्ही बाजूला बांबू उभे करून त्याला दोरी बांधून त्या दोरीवर ही चिमुकली कसरतीचे खेळ करून दाखवत आहे. सराव अन् धाडसाच्या जोरावर हे सादरीकरण होत असले तरी चुकून तोल गेला तर जीवावर बेतू शकते. जीव धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्यासाठी दोरीवरची कसरत पाहून अनेकजण जवळ ठेवलेल्या ताटात पैसे टाकतात. परंतु ही कसरत मनोरंजन किंवा साहस नसून या बालकांची मजबुरी आहे, हे प्रशासनासह बघ्यांच्याही लक्षात येत नाही. शासनाकडून भिकारीमुक्त शहर अभियान राबवले जात आहे. बालभिक्षेकरी प्रतिबंध कायदा अस्तित्वात असतानाही असे द़ृश्य गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात दिसत आहे.
संवेदनशीलता हरवत आहे...
दोरीवरची कसरत म्हणजे केवळ मनोरंजन म्हणून याकडे पाहिले जाते; मात्र या चिमुकलीचा जीव धोक्यात घालून सुरू असलेला खेळ थांबवण्यासाठी कोणही पाऊल उचलत नाही. पालकांच्या फिरस्त्या वास्तव्यामुळे ही मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत. त्यांचे निरागस बालपण हिरावत आहे. सामाजिक संस्था व एनजीओंचा सुळसुळाट असतानाही अशा मुलांसाठी किंवा त्यांच्यावर ही वेळ येऊ नये यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने समाजातील संवेदनशीलता हरवत चालल्याचे वास्तव समोर येत आहे.