सांगली

सांगली : शंभर कोटींचा निधी अन् फुटीर नगरसेवक चर्चेत

Shambhuraj Pachindre

सांगली पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याचे पडसाद सांगली महानगरपालिकेतही उमटले. महापालिका वर्तुळात दिवसभर चर्चांना उधाण आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या 100 कोटी निधीचे काय होणार? भाजप फुटीर नगरसेवकांवर आता तातडीने अपात्रता कारवाई होणार, अशी चर्चा रंगली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिकेला विकास कामांसाठी शंभर कोटींचा निधी देण्याची घोषणा नुकतेच केली. शंभर कोटींचा निधी मिळणार म्हटल्यावर महानगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये उत्साह निर्माण झाला. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एक वर्षावर आली असल्याने हा 100 कोटींचा निधी सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. कुपवाड ड्रेनेज योजनाही मार्गी लावण्याचे आश्‍वासन अजित पवार यांनी दिले होते. त्याअनुषंगाने फाईलींची हालचाल सुरू झाली होती. मात्र मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारत सुरत गाठल्याने राज्य सरकारच्या अस्थिरतेचे वृत्त सर्वत्र पसरले.

महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले. महापालिकेला जाहीर झालेल्या 100 कोटींचे काय होणार, असा प्रश्‍न उमटला. राज्यातील सरकार बदलल्यास महापौर, उपमहापौर निवडणुकीत फुटलेल्या भाजपच्या 5 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई तातडीने होणार. भाजपच्या फुटीर नगरसेवकांना शासनाकडून आता 'अभय' मिळणार नाही, अशी चर्चाही सुरू होती. एकूणच महापालिकेत भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांमध्ये खुशी दिसत होती, तर राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक सावध पवित्र्यात चर्चा करत होते.

राज्य सरकार अस्थिर होताच महापालिकेत चर्चांना उधाण : राष्ट्रवादी सावध; भाजपमध्ये खुशी

'आता प्रभाग रचना आम्ही म्हणेल तसे…!'

महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये राज्याच्या राजकारणाची चर्चा रंगली होती. 'शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील सरकार बदलणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आता आम्ही म्हणेल तसे होणार', असे महापालिकेतील भाजपच्या एका पदाधिकार्‍यांनी म्हटले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT