‘बंडा’नंतरही सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात सेनेची तटबंदी भक्कम

‘बंडा’नंतरही सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात सेनेची तटबंदी भक्कम

सिंधुदुर्ग/रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत 19 आमदारांच्या नाराजी नाट्यामुळे मविआ सरकार धोक्यात आले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार सेनेसोबत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील शिवसेना अभेद्य असून, आमच्या निष्ठा या शिवसेनेशी असल्याच्या प्रतिक्रिया आमदारांनी दिल्या. कोणत्याही आमिषाला जिल्ह्यातील आमदार बळी पडणार नसल्याची ग्वाही यावेळी चारही आमदारांनी दिली.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर 'मविआ'ची मते फुटल्यावरून कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर सायंकाळपासून शिवसेनेचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे 'नॉट रिचेबल' होते. त्यांच्यासोबत जवळपास 19 शिवसेना आमदार नॉट रिचेबल आहेत. मंगळवारी सकाळपासूनच प्रसारमाध्यमातून येणार्‍या वृत्तामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार सध्या कोठे आहेत, याची चर्चा रंगली होती.

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते अनिल परब आणि अन्य नेते मंडळींनी खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांना डावलण्याचा प्रयत्न केला होता. दापोली, मंडणगडच्या निवडणुकीतही त्यांना बाजुला ठेवले होते. त्यामुळे शिंदे यांच्या बंड नाट्यात योगेश कदमांचे नाव आहे का याची माहिती मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते घेत होते. मात्र, योगेश कदम हे मुंबईतच असून शिवसेनेच्या बैठकांना उपस्थित असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिली. शिवसेना आपल्या रक्तात आहे, त्यामुळे शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.

गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव हे मंगळवारी चिपळूण येथे आयोजित गुहागर मतदारसंघातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीला उपस्थित होते. मुंबईत घडणार्‍या परिस्थितीबाबत वेळावेळी माहिती घेत होते. दुपारनंतर ते मुंबईला रवाना झाले. सायंकाळी वर्षा येथे झालेल्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली होती. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेच जी जबाबदारी खांद्यावर देतील ती पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजापूर-लांजाचे आमदार राजन साळवी हे रत्नागिरीत येण्यासाठी निघाले होते. मात्र, सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर ते पुन्हा मुंबईला रवाना झाले. आ. साळवी यांच्याशी संपर्क साधला असता, आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. माझी निष्ठा ही बाळासाहेबांच्या पायाशी आहे. त्यामुळे शिवसेनेशिवाय आपण कधी विचारही करणार नाही. आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी 'वर्षा' बंगल्यावर काही आमदारांसोबत जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य असून एकही आमदार फुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरीत मंगळवारी नियोजित दौरा होता. परंतु, सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर ते मुंबईतच तळ ठोकून होते. दिवसभर वर्षा बंगल्यावरील विविध बैठकांनाही त्यांनी उपस्थिती लावली. पक्षाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात ना. सामंत दिवसभर व्यस्त होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news